राजेश भोजेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : तीन महिन्यांपासून चार महिलांच्या अंगात भानामतीचे भूत थैमान घालत होते. अशात मोहरम आला. कुणीतरी गावाला करणी केली, असे सांगताच गावकऱ्यांच्याही डोक्यात संशयाचे भूत संचारू लागले. २१ ऑगस्ट रोजी या भुताने सैतानाचे रुप घेतले. भानामती संचारलेल्या महिला ज्यांच्याकडे दगड फेकत होत्या, गावकरी त्याला मारहाण करीत होते.... डोक्यातून भूत उतरलेले गावकरी आता खासगीत हे धक्कादायक वास्तव सांगत आहेत.....
जिवती हा चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम तालुका. या तालुक्यात अद्याप शासनाच्या योजनाच पोहोचल्या नाहीत. मग, जादुटोणाविरोधी कायदा कसा पोहोचणार? शिक्षणाच्या सोयी दूरच. गावात जायला रस्ते नाहीत. विकास शोधूनही दिसत नाही. जिवतीपासून १२ किमीवर वणी खुर्द हे जेमतेम ५०० लोकवस्तीचे गाव. तीन महिन्यांपासून एका अनोख्या संकटाने गाव झपाटले होते. गावातील चार महिलांच्या अंगात भानामती संचारत होती. यामागे गावातील आठ जण असल्याचा संशय गावकऱ्यांच्या मनात घर करीत होता. ही आठ नावे त्या भानामती संचारलेल्या महिलांसह अगदी गावातील लहान मुलांनाही पाठ होती.
मोहरम या गावात उत्साहात साजरा करण्यात आला. २१ ऑगस्टला त्या चार महिलांच्या अंगात भानामती संचारली. गावकरी मुख्य चौकात एकत्र जमले. भानामती संचारलेल्या महिला ज्यांच्याकडे दगड फेकून मारतील त्याने गावाला करणी केली, असा अर्थ काढून गावकरी त्या लोकांना मारहाण करीत सुटले. अंगात सैतान संचारल्यागत दोराने जखडून मारहाण करण्यात आली. कुण्यातरी सुज्ञ व्यक्तीमुळे ही बाब जिवती पोलिसांच्या कानावर पडली. लगेच ठाणेदार संतोष अंबिके यांच्यापाठोपाठ गडचांदूरचे उपविभागीय अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठले. पोलिसांनी दोराने बांधून ठेवलेल्या आठ जणांची सुटका करून रुग्णालयात हलविल्याने पुढील अनर्थ टळला.
दहाजणांना अटक, आरोपींची संख्या २३ वर
या प्रकरणी जिवती पोलिसांनी आणखी १० जणांना अटक केली आहे. यामुळे आता आरोपींची संख्या २३ वर गेली आहे. गावातील तणाव मंगळवारी काही प्रमाणात निवळल्याचे चित्र होते. मंगळवारी अटक केलेल्या आरोपींमध्ये शशिकांत ऊर्फ किरण चंद्रमणी कराळे (२५), साहेबराव सटवाजी पौळ (३५), केशव श्रावण कांबळे (३०), दिनेश अंकुश सोनकांबळे (२३), दत्ता धोंडिराम तेलंगे (३५), भागवत गोपाळ शिंदे (३४), विठ्ठव किसन पांचाळ (३७), वैजनाथ संबाजी शिंदे (५५) व विठ्ठल जगन्नाथ शिंदे (३५, सर्व रा. वणी खुर्द) यांचा समावेश आहे.
रविवारी रात्री १३ आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे या दहाजणांना अटक करण्यात आली. या प्रकरणात सर्वच आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी दिली. दरम्यान, गावातील लोकांचे ब्रेनवाॅश करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे धनंजय तावाडे व त्यांच्या टीमने जादूटोणा, भानामती, करणी, भूत, चमत्कार, भंडाफोड या विषयांवर वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रबोधन केले.