राजकुमार चुनारकर
चिमूर (चंद्रपूर) : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या खडसंगी बफर झोन परिसरात निमढेला, अलिझंझा गेटमधून येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करणारी तसेच फेब्रुवारी महिन्यात सचिन तेंडुलकर ताडोबात आला असता त्याची आवडती झालेली भानुसखिंडी वाघीण जखमी झाली आहे. जखमेने विव्हळत असतानाच ती आपल्या बछड्यांचीही काळजी घेत आहे. याचा व्हिडीओ पर्यटकांनी वायरल केल्याने भानुसखिंडी वाघीण पुन्हा पर्यटकांच्या चर्चेत आली आहे.
भानुसखिंडी वाघिणीचे बस्थान निमढेला, अलिझंझा गेट परिसरात आहे. भानुसखिंडी वाघीण आपल्या तीन बछड्यांना वेगवेगळे प्रशिक्षण देत त्यांच्या पोषणासाठी धडपडत आहे. निमढेला परिसरात तीन बछड्यांसह लंगडत चालणारा तिचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. शुक्रवारी सकाळी पर्यटकांना ही वाघीण जखमी अवस्थेत दिसून आली. वाघिणीवर वेळीच उपचार करावे, अशी मागणी वन्यजीवप्रेमींनी ताडोबा व्यवस्थापनाकडे केली आहे.
ताडोबा व्यवस्थापनाची वाघिणीवर बारीक नजर
उन्हाळा सुरू होताच ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. शुक्रवारी सकाळी ताडोबात सफारीसाठी गेलेल्या पर्यटकांना भानुसखिंडी वाघीण निमढेला परिसरात जखमी अवस्थेत तिच्या तीन बछड्यांना सोबत घेऊन फिरताना दिसून आली. छोट्या पानवठ्यावर ही वाघीण फिरत होती. तिच्या मागच्या पायाला गंभीर दुखापत झाली असल्याने चालताना तिला प्रचंड वेदना होत असल्याचे दिसून येते. हा व्हिडीओ एका वन्यजीवप्रेमीने समाजमाध्यमावर शेअर केला. वन्यजीव अभ्यासकांनी तो व्हिडीओ पाहून लगेच ताडोबाचे संचालकांना माहिती दिली. ताडोबा व्यवस्थापन या जखमी वाघिणीकडे बारीक लक्ष ठेवून आहे. लवकरच तिच्यावर गरज पडल्यास उपचार केला जाईल.
समाजमाध्यमावरील पर्यटकांनी टाकलेला वाघीण व बछड्याचा व्हिडीओ पाहिला व वरिष्ठांच्या सूचनेनुसार वाघिणीच्या हालचालीवर लक्ष ठेवून वाघिणीचा शोध घेत आहोत. त्यात वाघीण लंगडत चालताना दिसत आहे.
- किरण धानकुटे, वनपरिक्षेत्र अधिकारी, खडसंगी, (बफर झोन)