चंद्रपूर : पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आटाेपून परत जात असताना अचानक वाहनासमोर जनावर आले. त्याला वाचविण्याच्या नादात कार उलटली. या घटनेत सासू-सुनेचा जागीच मृत्यू झाला. तरी इतर सहा जण गंभीर जखमी आहेत. ही घटना चंद्रपूर-गडचिरोली मार्गावरील चिचपल्ली गावाजवळ गुरुवारी रात्री घडली.
किरण पारखी (३२), शोभा पारखी (६५) असे मृत सासू-सुनेचे नाव आहेत. तर, अनिल पारखी (४०), साधना पारखी (४५), राम पारखी (७), आराध्या पारखी (४), ओम (१०) व नंदिनी (१४) हे सहा जण गंभीर जखमी आहेत.
पोलीस कर्मचारी असलेले अनिल पारखी हे चंद्रपूर येथे मोठ्या भावाच्या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाला आले होते. गुरुवारी रात्री पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पारखी कुटुंबीय चामोर्शीकडे जाण्यास निघाले. चिचपल्लीजवळ वाटेत जनावर आडवे आल्याने चालकाने करकचून ब्रेक दाबला असता, वाहन उलटून बाजूलाच असलेल्या छोट्या नाल्यात पडले. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चेंदामेंदा झाला होता. यामध्ये सासू-सुनेचा जागीच मृत्यू झाला. तर, इतर सहा जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. अपघातात एकाच कुटुंबातील सासू व सुनेचा मृत्यू व सहाजण गंभीर जखमी झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
खाकीची माणुसकी
चिचपल्ली मार्गावर अपघात झाल्याची घटना रामनगर पोलिसांना कळविण्यात आली. कर्तव्यावर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल गोपाले व पथक हे घटनास्थळी दाखल झाले. मात्र, ही घटना मूल पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. परंतु, तरीसुद्धा त्यांनी रुग्णवाहिकेची वाट न बघता अपघातामध्ये जखमी असलेल्यांना पोलीस वाहनाने रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, मूल पोलिसांचे पथक घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी घटनेचा पंचनामा केला.