बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पार्थिवावर मुंबई, दादर येथे समुद्र किनाऱ्यावर अग्नीसंस्कार करण्यात आले. बौद्ध संस्कृतीनुसार या स्थळावर एक चैत्य उभारण्यात आला आहे. परिसराला चैत्यभूमि असे म्हणतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांच्या दिल्ली निवासस्थानी झाले. दिल्लीहून त्यांचे पार्थिव रात्री सव्वा तीन वाजता सांताक्रूज विमानतळावर आणण्यात आले. विमानातून डॉ. बाबासाहेबांचे पुष्पाच्छादित पार्थिव बाहेर येताच विमानतळावर असलेल्या पंचेवीस हजारांवर स्त्री- पुरुषांना रडू कोसळले. त्यानंतर नगरपालिकेच्या अॅम्बुलंन्समध्ये शव ठेवण्यात आले व मूक मिरवणुकीस प्रारंभ झाला. बाबासाहेबांचा चेहरा सर्वांना दिसावा म्हणून अॅम्ब्युलंसमध्ये खास प्रकाश योजनेची व्यवस्था करण्यात आली होती. सांताक्रूज ते दादर हे पाच मैलाचे अंतर पार करण्यास ३ तास लागले. पाच वाजून पाच मिनिटांनी अॅम्बुलंस राजगृहापाशी आली. तेथे रात्रभर साडेतीन लक्ष लोक अॅम्बुलंसची वाट पाहात बसून होते. ‘बुद्धं सरणं गच्छामि’ ची प्रार्थना तेथे सतत सुरू होती. अॅम्बुलंस राजगृहापाशी येताच, लोकांची एवढी गर्दी झाली की, पाच मिनिटे पोलिसांना व समता सैनिक दलाच्या सैनिकांना ते आवरणे अशक्य झाले. बरोबर सव्वापाच वाजता मेणबत्त्यांच्या मंगल प्रकाशात व उद्बत्त्यांच्या सुगंधमय वातावरणात डॉ. बाबासाहेबांचे शव अॅम्बुलंसमधून उतरविण्यात आले. त्यावेळी तेथे असलेले लाखो लोक धायमोकलून रडत होते. अर्ध्यातासानंतर डॉ. बाबासाहेबांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्याची जनतेस मुभा देण्यात आली. डॉ. बाबासाहेबांनी महानिर्वाण यात्रा ७ डिसेंबर १९५६ ला राजगृहापासून दुपारी दोन वाजता निघाली. १० ते १२ लाख स्त्री- पुरुष या प्रेतयात्रेमध्ये सामील झाले होते. ही तीन मैलाची महायात्रा होती. सायंकाळी सात वाजता दादर चौपाटीच्या विस्तीर्ण समुद्र किनाऱ्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पार्थिवावर बौद्ध पद्धतीने अग्निसंस्कार करण्यात आले. आपल्या मुक्तीदात्याला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी चैत्यभूमीवर लाखोंच्या संख्येने भीमानुयायी दाखल होतात. व चैत्यभूमीवर भीमसागर उसळतो आणि महामानवाला अभिवादन करतो.
चैत्यभूमीवर भीमसागर
By admin | Published: December 06, 2015 12:53 AM