शेकडोंची उपस्थिती : मासे उत्पादनासाठी तलावाची मागणी बल्लारपूर : तालुक्यातील विसापूर येथे समाजबांधव मच्छिमारीचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात. परंतु गावात तलाव नसल्याने अडचणीला सामोरे जावे लागते. उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे मूकमोर्चा काढण्यात आला. गावातील क्रीडांगण तलाव मच्छी उत्पादन घेण्यासाठी देण्यात यावा, या मागणीला अनुसरुन येथील भोई समाज सेवा संघातर्फे सरपंच रिता जिलटे व ग्रामविकास अधिकारी एल.वाय. पोबरे यांना निवेदन देण्यात आले.चंद्रपूर जिल्हा भोई समाज सेवासंघ शाखा विसापूरच्या वतीने ग्रामपंचायतीला निवेदन सादर करण्यापूर्वी समाज बाधवांचा मूकमोर्चा राजू लांडगे यांच्या नेतृत्त्वात काढण्यात आला. त्यामध्ये शेकडोंवर समाज बांधव सहभागी झाले. त्यानंतर ग्रामपंचायत समोर पटांगणावर सभा घेण्यात आली.विसापूर येथील भोई समाज मोठ्या संख्येत आहे. समाज बांधवाकडे उत्पादनाचे कोणतेही साधन नाही. परिणामी समाज दारिद्रयात आहे. गावातील शिवाजी चौक लगत तलाव होता. परंतु कित्येक वर्षांपासून क्रीडांगण होणार म्हणून सांगितले जात होते. मात्र अद्यापही त्या ठिकाणी क्रीडा संकूल उभारण्यात आले नाही. यामुळे सदर तलावाचे खोलीकरण करून भोई समाजाला शिंगाडा शेती व मत्स्यपालन व्यवसाय करण्यास उपलब्ध करून देण्याची मागणी राजू लांडगे यांनी केली. ग्रामपंचायतीने मत्स्यव्यवसाय करणाऱ्यांसाठी ओटे बांधून मत्स्यबाजारासाठी जागा देण्याची आग्रही मागणी निवेदनातून केली. येथील सरपंच रिता जिलटे यांना निवेदन सादर करणाऱ्या शिष्टमंडळात विसापूर भोई समाज सेवासंघाचे दौलत पारशिवे, ऋषी पारशिवे, प्रमोद पचारे, प्रदीप लांडगे, महिला आघाडीच्या विजया मारबते, पार्वता पारशिवे, निलीमा दाते, शीतल इंगोले, सुवर्णा मांढरे, चित्रा नान्हे, अॅड. मनोज पारशिवे, दिलीप नान्हे आदींचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)
विसापूर येथे भोई समाजाचा मोर्चा
By admin | Published: October 02, 2016 12:51 AM