मूलच्या सौंदर्यीकरणात भर : दोन कोटी ३१ लाख रुपये मंजूर मूल : शहराच्या मध्यभागी व बसस्थानक जवळील तलावाच्या सौंदर्यीकरणांतर्गत तलाव खोलीकरणाच्या कामाचे भूमीपूजन मूल नगर पालिकेच्या नगराध्यक्ष प्राचार्य रत्नमाला भोयर व उपाध्यक्ष नंदू रणदिवे यांच्या हस्ते बुधवारी सकाळी १० वाजता पार पडले. या कामासाठी राज्याचे अर्थ व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दोन कोटी ३१ लाख रुपये मंजूर केले आहे. कार्यक्रमाला पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अभियंता घंगारे, शाखाधिकारी सोनेकर, जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता वानखेडे, आत्राम उपअभियंता अयुब, माजी नगरसेवक प्रभाकर भोयर, अनिल संतोषवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मंगेश पोटवार आदी मान्यवर उपस्थित होते. तलावाच्या सौंदर्यीकरणांतर्गत तलावाच्या बुडीत क्षेत्रात खोदकाम करण्यात येणार आहे. त्यामुळे ०.१५ दशलक्ष घनमीटर पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. खोदकामातून निघालेली माती जवळच असलेल्या खोलगट जमिनीवर टाकून ती जमीन उंच करण्यात येणार असून त्या ठिकाणी प्रस्तावित उद्यानाची निर्मिती प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. सदर खोलीकरणाचे काम जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागाद्वारे करण्यात येत असून सौंदर्यीकरणांतर्गत इतर कामे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे संचालन व आभार कालवे निरीक्षक गणवीर यांनी केले. यावेळी पाटबंधारे विभागाचेव जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागाचे बहुसंख्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या कामामुळे शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडणार आहे. (शहर प्रतिनिधी)
तलाव खोलीकरणाच्या कामाचे भूमिपूजन
By admin | Published: April 20, 2017 1:39 AM