८५ टक्के आरक्षणाची मागणी : यापुढे ४३ हजार गावांमध्ये निघणार मोर्चे चंद्रपूर : ओबीसी, अनुसूचित जाती-जमाती, भटके-विमुक्त, बारा बलुतेदार, मराठा, मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध, लिंगायत, शिा, जैन, शिवधर्मीय आदी समुहातील बहुजन समाजाला ८५ टक्के आरक्षण लागू करण्यात यावे, अशी मागणी करीत सोमवारी चंद्रपूर येथे बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा बाबरतुल्लाह दर्गा मैदान येथून दुपारी २ वाजता काढण्यात आला. शहरातील प्रमुख मार्गाने फिरविण्यात आल्यानंतर मोर्चाचा प्रारंभस्थळी समारोप करण्यात आला. तत्पूर्वी, झालेल्या प्रबोधन सभेमध्ये राज्यातील ४३ हजार ७७१ गावांमध्ये बहुजन क्रांती मोर्चा आयोजित करण्याची घोषणा करण्यात आली.विविध सामाजिक संस्थांतर्फे या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. ‘एकच पर्व, बहुजन सर्व’, अशी घोषणा घेऊन विविध मागण्यांचे फलक आणि विविध रंगाचे ध्वज हातात घेऊन मोर्चा शहरातून फिरविण्यात आला. चांदा क्लब मैदान येथून हा मोर्चा पाण्याची टाकी चौक, जटपुरा गेट, गिरनार चौक, गांधी चौकमार्गे जटपुरा गेट आणि तेथून बाबरतुल्लाह दर्गा मैदानात समारोप करण्यात आला. तेथून भारत मुक्ती मोर्चाचे डी. आर. ओहोळ यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. तेथे मोर्चेकऱ्यांच्या वतीने मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. मोर्चा प्रारंभ होण्यापूर्वी बाबरतुल्लाह दर्गा मैदानात प्रबोधन सभा घेण्यात आली. या सभेमध्ये डी. आर. ओहोळ म्हणाले, ३६ जिल्ह्यांमध्ये मोर्चे काढण्यात आल्यावर महामोर्चाचे आयोजन २१ जानेवारीला मुंबई येथे करण्यात येत आहे. त्यानंतर प्रबोधनाचे काम थांबणार नसून राज्यातील ४३ हजार ७७१ गावांमध्ये गावपातळीवर मोर्चांचे आयोजन करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.यावेळी अॅड. फरहान मिर्झा बेग म्हणाले की, मुस्लीम समाज या देशातील मूळनिवासी आहे. अॅड. रफिक यांनी मुस्लीम आरक्षण संविधानाच्या चौकटीत येत असल्याचे उच्च न्यायालयाने प्रमाणित केल्याचे सांगितले. एमआयएमतर्फे इरफानबाबा शेख यांनी मोर्चाला समर्थन दिले. यशोधरा पोतनवार दिवाकर पेंदाम राजू झोडे, सुधाकर चौके , प्रा. हस्ते, किशोर पोतनवार, डॉ. राकेश गावतुरे, डॉ. अभिलाषा गावतुरे, प्रवीण खोबरागडे, उमेश कडू, राजूरकर, अंकूश वाघमारे, संगिता कांबळे, अली अन्वर, मुश्ताक शेख, भारती रामटेके, सुधाकर चौके आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी हातात फलक घेऊन सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)मोर्चेकऱ्यांच्या मागण्याशेतमालाचे भाव ठरविण्याचा अधिकार शेतकऱ्यांना मिळावा, ओबीसींची जातीनिहाय गणना तत्काळ करा, अॅट्रासिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करा, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या, मुस्लिमांना १५ टक्के आरक्षण लागू करा, आदिवासींसाठी राज्यघटनेतील अनुसूची ५ व ६ तत्काळ लागू करा, बारा बलुतेदारांच्या हक्काची अंमलबजावणी करा, महिलांना सर्वच क्षेत्रात ५० टक्के आरक्षण देण्यात यावे, ओबीसी, एससी, एसटी, एनटी, व्हीजेएनटी, एसबीसीच्या विद्यार्थ्यांना महागाई निर्देशांकानुसार शिष्यवृतीत वाढ करण्यात यावी आदीसह विविध मागण्या करण्यात आल्या.विविध वेशभूषेतील बालकांचा सहभागया मोर्चात पारंपारिक आदिवासींची वेशभूषा करून आदिवासी कार्यकर्ते सहभागी झाले होते. तसेच संत तुकाराम महाराज, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अहल्याबाई आदी महापुरूषांच्या वेशभूषेमधील बालके सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र होते.
बहुजन क्रांती मोर्चाची धडक
By admin | Published: January 17, 2017 12:26 AM