आंबोली : आंबोली-भिसी परिसरातील नद्या, तलाव, नाले परिसरात शिकारी फासे लावून शिकार करीत आहे. याकडे वन विभागासह संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे. जंगली प्राणी पाण्याचा शोधात भटकत आहे. शेतशिवारात जंगलामध्ये काही प्रमाणात पाणवठे असून मे महिन्याच्या उन्हात प्राणी व पक्षांना तुष्णा भागविण्यासाठी या पाठवठ्यावर जातात. काही परिसरात शिकारी पाणवठ्याच्या ठिकाणी आकडे टाकत आहे. जाळे टाकून शिकारी झाडाची पालवी तोडून पाणवठ्याच्या काही अंतरावर झोपडी बनवून लपून बसतात. पाणवठ्यावर टाकलेल्या जाळाची दोरी मात्र शिकार्याच्या हातात असते. पक्षी येताच ही दोरी ओढून पक्ष्यांना जाळ्यात जेरबंद करतात. या परिसरात अगदी छोट्या पाणवठ्याची संख्या ५० च्या जवळपास असल्याचे समजते. या सर्व पाणवठ्यावर वनविभागाच्या कायद्याचा भंग करून मोठ्या प्रमाणात असंख्य जातीच्या पक्ष्यांची शिकार केली जात आहे. शिकार करून भिसीच्या बाजारात, गुजरी पाडावामध्ये विकल्या जात आहेत. पक्ष्याच्या जातीमध्ये कवडी, टूळी, मोट, तितिर, बटेर, पाणबगळा, ढोकरू, टिटवी व अन्य जातींच्या पक्ष्याची मोठ्या प्रमाणात शिकार करण्यात येत आहे. भिसी-शंकरपूर येथे वन विभागाचे क्षेत्र कार्यालय असून या कार्यालयात वनरक्षक व चौकीदार कार्यरत आहे. मात्र शिकार्यांकडे वन विभागाने दुर्लक्ष केले आहे. दिवसेंदिवस सर्व जातीच्या पक्षाची संख्या कमी होत आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या शेतपिकावरही मोठा परिणाम झाला आहे. पर्यावरण संतुलनासाठी पक्षी हा महत्त्वाचा दुवा असून या पक्ष्यांच्या अवैध शिकारीमुळे परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करीत आहेत. पानवठ्यावर होणार्या शिकारीवर आळा घालावा, अशी मागणी करण्यात आली आहे. (वार्ताहर)
पाणवठ्यांवर जाळे टाकून पक्ष्यांची शिकार
By admin | Published: May 20, 2014 11:31 PM