राजुरा : राजुरा शहरात सर्व महापुरुषांचे चौक असून, नगरपरिषदेने सर्व चौकांचे सौंदर्यीकरण करण्याचे काम सुरू केले आहे. मात्र शहरात आदिवासी बांधवांचे प्रेरणास्थान असणारे भगवान बिरसा मुंडा, क्रांतिवीर बाबूराव शेडमाके यांच्या चौकाचे सौंदर्यीकरण बाकी असल्याचे दिसत आहे.
यामुळे प्राधान्याने हे काम करण्याचे आश्वासन राजुरा नगर परिषदेचे अध्यक्ष अरुण धोटे यांनी शिष्टमंडळाला दिले आहे.
नगर परिषद राजुरा येथे नुकताच आदिवासी कार्यकर्त्यांसोबत बैठक पार पडली. त्या बैठकीत ते बोलत होते.
राजुरा शहरात आदिवासींचे प्रेरणा स्थान असणारे क्रांतिकारक महापुरुषांच्या चौकाकडे नगर परिषद दुर्लक्ष करणार नाही. तसेच चौकाच्या सौंदर्यीकरणासाठी निधी कमी पडू देणार नाही. तसेच उत्कृष्ट आर्किटेक्ट नेमू, असेही त्यांनी झालेल्या बैठकीत बोलून दाखविले. यामुळे आदिवासी बांधवांच्या भावनांची कदर करणारे अध्यक्ष नगरपरिषदेला लाभले, असे मत आदिवासी बांधवांनी व्यक्त केले आहे.
झालेल्या बैठकीत आदिवासी कार्यकर्ते, उपाध्यक्ष अनिल देशपांडे, नगरसेवक आनंद दासारी व कार्यकर्ते उपस्थित होते.