राजू गेडाम
मूल : मूल शहरात मुलींचा जन्मदरवाढीची आनंदवार्ता आहे. सन २०२० -२१ या वर्षात मुली १९९ तर मुले १६७ जन्माला आली असल्याची आरोग्य विभागात नोंद करण्यात आली आहे.
शासनाने लोकांमध्ये मुलींविषयी केलेली जनजागृती बघता त्याचा सकारात्मक परिणाम असल्याचे बोलले जात आहे. यात विशेष म्हणजे लिंगनिदान केले जात नसल्याने मुलीच्या जन्मदरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे व मुलांइतका मुलींचा जन्मदर वाढविणे या उद्देशाने बेटी बचाओ, बेटी पढाओ या योजनेच्या धर्तीवरच मुलींचा जन्मदर वाढविणे व त्यांना शिक्षण देणे आदी बाबीतून जनजागृती करण्यासाठी शासनाने महत्त्वाची पावले उचलली. त्यामुळे मुलींविषयी नकारात्मक विचारांना मूठमाती देण्यात आली. त्याचाच परिणाम मुलीचा जन्मदर मुलांपेक्षा वाढला आहे. दर हजार मुलांमागे मुलींचा जन्मदर वाढणे शासनाला अपेक्षित आहे. शहराची लोकसंख्या २८,८०३ असून सन २०२०-२१ या वर्षात १९९ मुली तर १६७ मुले जन्माला आली आहेत. संपूर्ण राज्यात सर्व गटातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबात जन्मणाऱ्या तसेच दारिद्र्य रेषेवरील पांढरे रेशनकार्डधारक कुटुंबात जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी सुकन्या योजनेचा लाभ कायम ठेवून त्याव्यतिरिक्त मुलीचा जन्म झाल्यापासून मुलगी १८ वर्षे होईपर्यंत लाभ देण्यासाठी अनेक योजना शासनाने निर्गमित केल्याने पालकही समाधानी आहेत.
बॉक्स
गर्भवती महिलांची नियमित तपासणी
उपजिल्हा रुग्णालयात वेळोवेळी गर्भवती महिलांची तपासणी करून त्यांना मार्गदर्शन केले जाते. मुला-मुलींबाबत भेदभाव न करता दोन्ही समान आहेत, हे सांगितले जाते. उलट शासनाकडून मुलींसाठी विविध योजना कार्यान्वित केल्या जात असल्याने भविष्यात पालकांना फायदाच होणार आहे. त्यामुळे दांपत्य बाळाचे लिंगनिदान करण्यास पुढे धजावत नसल्याचे दिसून आले आहे.
कोट
मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढावे, यासाठी गर्भवती महिलेची नियमित तपासणी केली जाते. सकस आहाराविषयी वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते. रुग्णालयात असलेल्या समितीच्या वतीने लिंगनिदान केले जाणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेतली जात आहे. त्यामुळे मूल शहरात मुलींच्या जन्माचे प्रमाण जास्त प्रमाणात आहे. ही समाधानाची बाब आहे.
-डॉ. उज्ज्वल इंदूरकर, वैद्यकीय अधीक्षक, मूल