लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : पंतप्रधान नरेंद्र्र मोदी हे अर्धशिक्षित डॉक्टर असून काँग्रेसच्या प्रमुखांना आॅपरेशनची भीती दाखवून कॉंग्रेसला ब्लॅकमेल करीत आहेत. त्यामुळे देशात काँग्रेससोबत कुठेही महाआघाडीचे गठबंधन होऊ शकले नाही. काँग्रेस, भाजप राजकीय मुद्यांवर एकमेकांना ब्लॅकमेल करीत असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.चिमूर-गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे उमेदवार डॉ. रमेश गजभे यांच्या प्रचारार्थ ब्रह्मपुरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. मंचावर चिमूर-गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे उमेदवार डॉ. रमेश गजभे, गोंदिया-भंडारा लोकसभा क्षेत्राचे उमेदवार प्राचार्य डॉ. दशरथ नान्हे, माजी न्यायमूर्ती चंद्र्रकांत मेश्राम, डॉ. प्रेमलाल मेश्राम, विलास मैंद, डॉ. राहुल मेश्राम व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.अॅड. आंबेडकर पुढे म्हणाले, पुलवामा येथे घडलेल्या घटनेचा भाजप राजकारण करीत आहे. दहशतवाद्यांचे पूर्ण हवाई अड्डे का उद्ध्वस्त केले नाही, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडताना त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी लक्षात घेतल्या जाते. त्यानंतरच निवड होती. त्यामुळे स्वत:चे घर न सांभाळणाऱ्या भारतातील नरेंद्र मोदी यांना मतदारांनी कदापि निवडून देऊ नये. असे झाल्यास देश पुन्हा विकासात मागे पडेल, असा इशाराही अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला. यावेळी डॉ. नान्हे, डॉ. रमेश गजभे, चंद्र्रकांत मेश्राम यांनीही विचार मांडले.प्रास्ताविक डॉ. प्रेमलाल मेश्राम, संचालन एस.के. रामटेके यांनी केले. आभार डॉ. राहुल मेश्राम यांनी मानले.
भाजप काँग्रेसला ब्लॅकमेल करीत आहेत : प्रकाश आंबेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2019 12:40 AM