लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात एकेकाळचे मित्रपक्ष शुक्रवारी आंदोलनाच्या माध्यमातून आमने-सामने आल्याचे चित्र बघायला मिळाले. राज्यात महाआघाडीची सत्ता असली तरी मुख्यमंत्री शिवसेनेचे आहे. तर देशात भाजपची सत्ता आहे. भाजपने वीजबिल दरवाढ, वीज पुरवठा खंडित करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाचा रस्त्यावर उतरून विरोध केला. भाजपचे टाळा ठोको, हल्लाबोल हे राज्यव्यापी आंदोलन चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र झाले. हे आंदोलन भाजप नेते विधिमंडळ लोकलेखा समिती अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले, तर दुसरीकडे केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढीविरोधात शिवसेने रस्त्यावर उतरून बैलबंडी मोर्चा काढून जनतेचे लक्ष वेधले. या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
चंद्रपूर महानगरात मुख्य कार्यकारी अभियंता यांना निवेदन चंद्रपूर येथे भारतीय जनता पार्टी महानगरच्या वतीने महावितरणच्या बाबूपेठस्थित कार्यालयासमोर टाळा ठोका, हल्ला बोल आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपा महानगर महामंत्री सुभाष कासनगोट्टूवार, ब्रिजभूषण पाझारे, रवी गुरनुले,मंडळ अध्यक्ष संदीप आगलावे, सचिन कोतपल्लीवर, विठ्ठल डुकरे, दिनकर सोमलकर, रवी लोणकर, भाजप सचिव रामकुमार अकापेलीवर, सुरज पेद्दुलवार, सुनील डोंगरे, सूर्यकांत कुचनवार,चंदन पाल, विनोद शेरकी, चांदभाई, अमोल नगराळे, पराग मलोदे, महिला मोर्चा महामंत्री प्रज्ञा गंधेवार, उपाध्यक्ष लीलावती रविदास, सचिव रेणू घोडेस्वार,रमिता यादव, भाजयुमोचे आकाश मस्के, राकेश बोमनवार,राजेश कोमल्ला, सचिन लगड, आकाश ठुसे, निश्चय जवादे,महेश कोलावार, बंडू गौरकार, सचिन मुळे व शंकर चौधरी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. आंदोलनानंतर एका शिष्टमंडळाने महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता यांना निवेदन सादर केले.भाजपाचे नागभीड येथे आंदोलननागभीड : आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्या नेतृत्वात नागभीड तालुका भाजपाच्या वतीने येथील उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयावर वीज बिलासंदर्भात धडक देऊन आंदोलन करण्यात आले. या मोर्चाची सुरूवात येथील तालुका भाजपाच्या कार्यालयातून करण्यात आली. आ. किर्तीकुमार भांगडिया यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. हा मोर्चा सरळ येथील वीज वितरण कार्यालयावर धडकला. यावेळी महावितरण कंपनीच्या व आघाडी शासनाच्या विरोधात विविध घोषणा देण्यात आल्या. वीजबील माफ करण्यात यासाठी निवेदन देण्यात आले.
शिवसेनेची केंद्र सरकारविरूद्ध नारेबाजी
चंद्रपूर : केंद्र सरकारने कोरोना लॉकडाऊननंतर २० वेळा पेट्रोल व डिझेल दरवाढ केल्याचा आरोप करून शिवसेनेने पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनादरम्यान चंद्रपुरातही शुक्रवारी जिल्हाधिकार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. पेट्रोल व डिझेल महागल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक ताण वाढला. मोदी सरकार सत्तेत आल्यावर पेट्रोल, डिझेल व गॅस सिलिंडरचे भाव कमी करू, असे आश्वासन दिले होते मात्र, हे आश्वासन खोटे निघाले, त्यामुळे पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी केली. मोर्चाची सुरूवात जटपुरा गेटपासून झाली. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरूद्ध नारेबाजी केली. आंदोलनात शिवसेना, युवासेना व महिला सेनेचे बहुसंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.