राजुरा : लोकसभा निवडणूकीत राजुरा विधानसभा क्षेत्रातील मतदारांनी यंदा काँग्रेस पक्षाच्या नेतेमंडळींना चांगलाच धडा शिकविला आहे. काँग्रेस मंडळी अतिविश्वासात रममाण झाली होती. मात्र दुसरीकडे मतदार त्यांच्याप्रति नाराज होते. त्यामुळे त्यांनी भाजपाला आघाडी मिळवून दिली आणि काँग्रेसचा बालेकिल्ला भाजपाच्या गोटात गेला. लोकसभा निवडणुकीत नेहमीच काँग्रेस पक्षास आघाडी मिळत होती. माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर यांच्या नेतृत्वात पक्ष संघटित होता. काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी उभे राहत होते. संघटित होऊन निवडणुकीत भाग घेत होते. त्यांच्या शब्दास मानत होते. त्यांच्यावर कार्यकर्त्यांचा विश्वास होता. त्याच विश्वासाने कार्यकर्त्याचे कामे केली जात होती. मतदारावर त्याची पकड होती. ते घराच्या चौकटीतून बाहेर निघून कार्य करीत होते. कार्यकर्त्यासाठी सार्थक ठरत होते. त्यामुळे कार्यकर्ते व मतदार त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहत होते. परंतु सध्या ते वयोवृद्ध झाले आहेत. अपघाताने कमजोर झाले. त्यामुळे त्यांनी आमदार सुभाष धोटे यांच्याकडे पक्षाची धुरा दिली. तसेच न.प. उपाध्यक्ष अरुण धोटे राजकारणात सक्रिय झाले. धोटे बंधुवर काँग्रेस पक्षाची जबाबदारी आली. त्याची ही पहिलीच लोकसभा निवडणूक होती. त्यांनी या निवडणुकीत सक्रीय भाग घेऊन काँग्रेस पक्षाची मताची आघाडी कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केले. मामुलकर प्रकृती अस्वस्थमुळे जास्त फिरु शकले नाही. त्याचा परिणाम मतदारावर झाला. भाजपाचे उमेदवार खा. हंसराज अहीर या विधानसभा क्षेत्रात लक्ष ठेवून शेतकर्यांच्या हितासाठी लढत होते. त्यांचा दांडगा जनसंपर्क होता. प्रत्येक गावास भेट दिली. वेकोलिद्वारा घेण्यात येणार्या जमिनीच्या (अधिग्रहण) दरात मोठी वाढ केली. दोन एकर जमीनधारकास नोकरी देण्याचे नियम तयार करावयास लावले. यापूर्वी वेकोलिकडून प्रतिएकर २५ हजार मिळत होते. ते आता आठ ते दहा लाख केले. त्यामुळे जनतेत त्याच्या कार्याप्रति आस्था निर्माण झाली. आम जनतेसोबत शासकीय कार्यालयात जाऊन अधिकार्यांशी चर्चा करुन समस्या सोडवत होते. त्याचा परिणाम या लोकसभा निवडणुकीत पाहावयास मिळाला आहे. लोकसभा निवडणुकीत नेहमीच भाजपास तिसरे स्थान राहत होते. या विधानसभा क्षेत्रात भाजपाचे मतदार र्मयादित होते. त्यावर ते समाधान मानत होते. ती र्मयादा मोडून काढण्यासाठी खा.हंसराज अहीर यांनी कार्यर्त्याना संघटित केले. दर १५ दिवसाने राजुरा येथील भाजपा कार्यालयात येऊन जनतेच्या समस्यावर चर्चा करून त्या सोडविल्या जात होत्या. त्याचा परिणाम जनतेवर झाला. भाजपाचे र्मयादीत कार्यकर्ते असतानासुद्धा मोठी आघाडी घेऊन शेतकरी संघटना व काँग्रेस पक्षास मागे टाकले. हीच त्यांच्या कार्याची पावती आहे. काँग्रेस पक्षाचे नेते मंडळी घराच्या चौकटीत बसून कार्य करीत होते. त्यांना जनता आपल्या पाठीशी आहे अशी भावना होती. आघाडी कायम ठेवून यावर त्याचा विश्वास होता. परंतु मतदारांनी त्याच्या अतिविश्वासास तडा देवून चौकटीच्या बाहेर निघा, असा मतदानातून जणू इशाराच दिला आहे. या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांत उत्साह नव्हता. गटबाजीने पक्ष पोखरला आहे. त्यामुळे मतदारापर्यंत कार्यकर्ते पोहचले नाही. जनतेत काँग्रेस व शेतकरी संघटनेबाबत नाराजी होती. त्यामुळेच भाजपाने गड काबीज केला. (तालुका प्रतिनिधी)
काँग्रेसचा बालेकिल्ला भाजपाच्या गोटात
By admin | Published: May 22, 2014 1:01 AM