सावली : सध्याचे सरकार हे झोपेचे सोंग घेवून काम करीत आहे. झोपेत असलेल्या माणसाला एकदाचे जागवता येते. परंतु, झोपेचे सोंग घेणाऱ्या माणसाला जागे करता येत नाही, असा घणाघाती आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला. संविधानाला सर्वोच्च माणून देशाचे काम आजवर आम्ही करीत आलो. परंतु सध्याचे सरकार हे घटनेच्या कायद्याला बाजूला सारुन चुकीच्या पद्धतीने काम करीत असल्याने बेरोजगारी वाढविण्याचे काम करीत आहे, असा आरोपही त्यांनी केला. सावली येथील नगरपंचायत निवडणूक प्रचारानिमित्त सोमवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विजय वडेट्टीवार, जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, माजी आमदार सुभाष धोटे, अनितराव धारट, विनोद दत्तात्रय, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, राम मेश्राम, काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेश सिद्धम, प्रकाश रार्इंचवार, मंगला चिमड्यालवार, राकेश गड्डमवार आदी उपस्थित होते.गोसेखुर्द धरणाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचविण्यासाठी आपण प्रयत्न केले व त्यात यश आले. पुन्हा दुबार पेरणीकरीता आपण प्रयत्न करणार असून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न असल्याचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. यावेळी अनेकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. कार्यक्रमाला नगरपंचायत निवडणुकीकरिता उभे असलेले १७ उमेदवार उपस्थित होते. संचालन शेख तर आभार राजेश सिद्धम यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)गाव सावली नागरिकमात्र उन्हात!सावली ग्रामपंचायतीवर अनेक वर्षांपासून भाजपाची सत्ता होती. मात्र विकास कामे केली नाही. गाव सावली असले तरी गावातील सामान्य जनतेला उन्हात ठेवण्याचे काम भाजपाने केले आहे. जनतेच्या समस्या जैसे थे राहिल्या. त्यामुळे काँग्रेसला साथ द्या, विकास कामे करवून दाखवू. काँग्रेस पक्षाच्या पाठिशी राहून नगरपंचायतीच्या निवडणुकापासून सुरुवात करा. सर्व सामान्याला न्याय देण्याचे काम आम्ही करणार असल्याचे आश्वासन खा. अशोक चव्हाण यांनी दिले.
भाजप सरकारने घेतले झोपेचे सोंग
By admin | Published: October 27, 2015 1:07 AM