चंद्रपूर : महाराष्ट्रातील खनिजच नाही तर पाणीसुद्धा लुटण्याचा प्रकार सुरू आहे. गोसेखुर्दचे पाणी कमी करून खंडवा जिल्ह्याला देण्याचा प्रयत्न चालला आहे. एनर्जिटीक महाराष्ट्राला डीएनर्जिटीक करण्याचा प्रयत्न भाजपने चालवला आहे. आता एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका घेणे गरजेचे आहे. भाजपने त्यांचा वापर करू नये, अशी टीका बहुजन वंचित आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी येथे केली.
ग्रामपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आढावा घेण्यासाठी ते चंद्रपुरात आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. पूर्वी बिमारू राज्याची संकल्पना होती. यातून त्या त्या राज्यांना बाहेर काढण्यात आले. मात्र, पंतप्रधानांच्या धोरणामुळे दक्षिणेतील राज्य आता चिंताग्रस्त आहेत. मिहानमध्ये दोन लाख प्रत्यक्ष आणि तीन लाख अप्रत्यक्ष रोजगार मिळणार असे चित्र रंगविले होते. मात्र, भाजपच्या धोरणामुळे कुठलाही फायदा विदर्भाला झाला नाही, याकडेही ॲड. आंबेडकर यांनी लक्ष वेधले.