चंद्रपूर : राज्य सरकारने कंत्राटी नोकर भरतीचा जीआर रद्द केल्यानंतर बेरोजगारांमध्ये समाधान व्यक्त होत आहे तर दुसरीकडे चंद्रपूर भाजप महानगर शाखेने शनिवारी काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना २००३ मध्ये कंत्राटी भरती केल्याचा आरोप करून काँग्रेस, शिवसेना (ठाकरे) व राष्ट्रवादी काँग्रेस (पवार) विरूद्ध शनिवारी (दि. २१) गांधी चौकात निदर्शने केली. त्यामुळे तत्कालीन सरकारची ती चूक होती तर विद्यमान भाजप सरकारने त्याची पुनरावृत्ती का केली, या प्रश्नावरून बेरोजगारांमध्ये हे निदर्शन चर्चेचा विषय ठरले.
कंत्राटी पदभरती करून युवकांच्या मनात असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कंत्राटी भरतीची सुरुवात काँग्रेस-राष्ट्रवादीने केली. २००३ मध्ये काँग्रेस-राकाँचे सरकार असताना शिक्षण विभागात कंत्राटी भरती झाली. त्यानंतर २०१० आणि २०११ मध्ये कंत्राटी भरतीचा जीआर काढण्यात आला. २०१३ मध्येही अशी भरती झाली. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना शरद पवार यांच्या आशिर्वादाने त्यांनीही कंत्राटी पदभरतीची निविदा काढली होती, असा आरोप भाजप महानगर अध्यक्ष राहुल पावडे यांनी केला.
आंदोलनात जि. प. चे माजी सभापती ब्रिजभूषण पाझारे, राजू गोलीवार,रविंद्र गुरणुले,अजय सरकार, प्रदीप किरमे, अरुण तिखे, सविता कांबळे, शीला चव्हाण, माया उईके, पुष्पा उराडे, वनिता डुकरे,ज्योती गेडाम, राहुल नकुलवार, रामकुमार अकापल्लीवार, भानेश मातंगी, विनोद शेरकी आदी सहभागी झाले होते.