चंद्रपूर : माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे कार्यक्षेत्र असलेल्या पोंभूर्णा येथील नगरपंचायत व्हाइट हाउसमध्ये कुणाची सत्ता येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. बहुचर्चित असलेली पोंभूर्णा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व बहुमताचे यश मिळवत व्हाइट हाउसवर आपला झेंडा फडकवला आहे.
मागच्या निवडणुकीत खाताही न खोललेली शिवसेना यावेळी चौकार मारून नगरपंचायतमध्ये प्रवेश केली आहे. तर काँग्रेसला मात्र एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे. भाजपा- काॅंग्रेस-शिवसेना अशी तिहेरी लढत नगरपंचायतच्या निवडणुकीत पाहायला मिळाली होती.
पोंभुर्णा नगरपंचायतीच्या १७ जागांपैकी १० जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत. मागील पाच वर्षांत विरोधी बाकावर बसणाऱ्या काँग्रेसला यावेळी फक्त एका जागेवर विजय मिळवून समाधान मानावे लागले आहे. तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने चार जागा लढविण्यात आल्या होत्या. त्यामध्ये वंचितने दोन जागेवर विजय मिळवून आपली ताकद दाखवली आहे. तर शिवसेनेने चार जागा जिंकून विरोधी पक्षाच्या भूमिकेतील आपली दावेदारी सिद्ध केली आहे.
विजयी उमेदवारांमध्ये प्रभाग क्र.१- बालाजी कामसेन मेश्राम (शिवसेना), क्र.२ आकाशी सुगत गेडाम (भाजपा), क्र.३- श्वेता महेंद्र वनकर (भाजपा), क्र.४- सुलभा गुरुदास पिपरे (भाजपा), क्र.५- अतुल विश्वनाथ वाकडे (वंचित), क्र.६ -रिना पवन उराडे (वंचित), क्र.७ -आशिष विलास कावटवार (शिवसेना), क्र.८- नंदा ऋषी कोटरंगे (भाजपा), क्र.९ शारदा प्रशांत गुरनुले (भाजपा), क्र.१० लक्ष्मण उद्धव कोडापे (भाजपा), क्र.११ नंदकिशोर भाऊजी बुरांडे (काँग्रेस), क्र.१२- रोहिणी रुपेश ढोले (भाजपा), क्र.१३ अजित अरुणराव मंगळगिरीवार (भाजपा), क्र.१४ अभिषेक कैलास बद्दलवार (शिवसेना), क्र.१५ उषा सदाशिव गोरंतवार (भाजपा), क्र.१६ रामेश्वरी गणेश वासलवार (शिवसेना), क्र.१७ -दर्शन गजानन गोरंटीवर (भाजपा) यांचा समावेश आहे.
दर्शन व गणेशमधील लढत लक्षवेधी
प्रभाग क्रमांक १७ कडे सर्वांचे लक्ष लागले होते. पोंभूर्णाच्या विकासात मोलाचे योगदान असलेले पोंभूर्णा नगरपंचायतचे प्रथम नगराध्यक्ष स्वर्गीय गजानन गोरंटीवार यांचे चिरंजीव दर्शन व शिवसेना शहर प्रमुख गणेश वासलवार यांच्यातील लढत लक्षवेधी होती. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यात बहुमत घेऊन भाजपाचे दर्शन गोरंटीवार निवडून आले.