चंद्रपूर : पोंभुर्णा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक गुरुवारी पार पडली. यामध्ये नगराध्यक्षपदी भाजपच्या सुलभा गुरुदास पिपरे, तर उपनगराध्यक्षपदी भाजपचे अजित मंगळगिरीवार विराजमान झाले.
शिवसेनेने सत्ता मिळविण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला. पण आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यावर विश्वास असलेल्या भाजपच्या सदस्यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहून व्हाइट हाउसवर भाजपचा कमळ फुलवला. १७ सदस्यीय पोंभुर्णा नगरपंचायतीमध्ये भाजप १०, शिवसेना ४, कॉंग्रेस १ आणि वंचित बहुजन विकास आघाडीचे २, असे पक्षीय बलाबल आहे.
यामध्ये शिवसेना, कॉंग्रेस आणि वंचित एकत्र आल्यानंतरही त्यांना दोन सदस्यांची आवश्यकता होती. त्यामुळे भाजपचे दोन सदस्य घेणे आवश्यक होते. याच दरम्यान भाजपतील नंदा कोटरंगे यांची पक्षासोबतची नाराजी समोर आली. नंदा कोटरंगे यांनी शिवसेनेकडून आपला अर्ज दाखल केल्यामुळे शिवसेनेचा नगराध्यक्ष बनण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र काही त्रुटीमुळे कोटरंगे यांचा अर्ज बाद झाला. शिवसेनेकडून रामेश्वरी वासलवार यांचाही अर्ज असल्याने नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या रामेश्वरी वासलवार व भाजपच्या सुलभा पिपरे यांच्यात थेट लढत होती. यामध्ये सुलभा गुरुदास पिपरे विजयी झाल्या.
भाजपच्या सुलभा पिपरे यांना १० मते पडली, तर शिवसेनेच्या रामेश्वरी वासलवार यांना सात मते पडली. उपनगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडीत भाजपचे अजित मंगळगिरीवार निवडून आले. त्यांना १० मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या रिना पवन ऊराडे यांना सात मते मिळाली.