चंद्रपूर : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना प्रादुर्भावासाठी महाराष्ट्र राज्य जबाबदार असल्याचे वक्तव्य केले होते. या विधानाचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटत असून राज्यातील कानाकोपऱ्यात मोदींचा निषेध केला जात आहे. सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात लिहीले जात आहे. मात्र, मोदींविरोधात पोस्ट लिहीण्यावरून एका तरुणाला भाजप कार्यकर्त्यांनी चक्क पोलीस ठाण्यात उठाबशा काढायला लावल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे.
हा प्रकार ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात घडला आहे. सध्या पंतप्रधान मोदी यांनी कोरोनावरून काँग्रेसवर केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरात वातावरण तापले आहे. याच धामधुमीत बुधवारी एका तरुणाने सोशल मिडीयावर मोदींविरोधात एक आक्षेपार्ह पोस्ट लिहीली होती. याबाबर भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर, सदर तरुणाला काल पोलीस ठाण्यात आणण्यात आले व चक्क पोलिसांसमोर त्याला उठाबशा काढायला लावण्यात आल्या. त्याने या पोस्टबाबत माफी मागत यापुढे अस काही लिहीणार नसल्याची ग्वाही दिल्यानंतर तक्रार मागे घेण्यात आली. महत्वाचं म्हणजे शिक्षा देण्याचा अधिकार कार्यकर्त्यांना कसा? हा सवाल इथे उपस्थित होतो.
नागपुरात गडकरींच्या घराबाहेर 'राडा'
संसदेत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस व महाराष्ट्रावर टीका केली. त्यावरून राज्यभरात काँग्रेस मोदींविरोधात आक्रमक झाली आहे. तर, सोशल मिडीयावरही मोदींवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. काल याच मुद्दयावरून नागपुरात काँग्रेस व भाजप कार्यकर्ते आमने-सामने आले व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घराबाहेर मोठा पॉलिटीकल राडा झाला. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आल्यानंतर तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यावरच तणाव निवळला.