चंद्रपूर : ओबीसींना राजकीय आरक्षण व पदोन्नतीमधील आरक्षण न मिळण्याचे महापाप हे भाजपचे असल्याचे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसेच विधानसभेचे माजी सभापती नाना पटोले यांनी व्यक्त केले. यापूर्वी केंद्र व राज्यात सत्ता असताना भाजपने ओबीसींच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. ओबीसींची जातनिहाय जनगणना करणे केंद्राच्या अखत्यारीत असूनही केंद्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचेही ते म्हणाले.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक जिवतोडे, महासचिव सचिन राजुरकर यांच्या हस्ते आमदार नाना पटोले यांचा सत्कार करण्यात आला.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील धोक्यात आलेले ओबीसीचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी राज्य सरकारने न्यायालयाच्या निर्णयानुसार कार्यवाही करावी, इतर मागासवर्गीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करावे व ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याबाबत निवेदन दिले. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या मागण्यांकडे लक्ष वेधून यावेळी चर्चा करण्यात आली.
यावेळी दिनेश चोखारे, प्रकाश देवतळे, रामू तिवारी, डॉ. अविनाश वारजुरकर, जयंता जोगी, प्रेमलाल पारधी, कुणाल चहारे, शाम लेडे, मनोज गौरकार, देवराव दिवसे, अनिल दागमवार, राजू हिवंज, दिलीप पायपरे, सुनील कोहपरे, लिलाधर तिवाडे, विलास भोयर, श्रीकृष्ण लोनबळे, विनोद आगलावे, गणेश कागदेलवार, रजनी मोरे, सुरेखा वांढरे, मंजुषा फुलझेले, विजया बोढे, रवी देवाळकर, विजय मालेकर, लीलाधर खंगार, रजनी मोरे आदी उपस्थित होते.