मुंबई/चंद्रपूर - लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली असून अद्यापही महाविका आघाडी आणि महायुतीमधील अंतिम जागावाटप निश्चित झालं नाही. दरम्यान, भाजपाने २३ उमेदवारांच्या नावांची घोषणा केल्याने राज्यातील २३ मतदारसंघात भाजपाने उमेदवारांसह प्रचाराला सुरुवात केली आहे. तर, काँग्रेसनेही १२ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली असून तिथेही प्रचार सुरू झाला आहे. त्यात भाजपाच्या पहिल्या उमेदवाराने आज आपला निवडणुकीचा फॉर्म दाखल केला. त्यावेळी, रेकॉर्डब्रेक मतांनी आम्ही विजयी होऊ, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
भाजपाने पहिल्याच यादीत यावेळी नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याचं दिसून आलं. त्यामध्ये, लोकसभा निवडणुकांसाठी इच्छुक नसलेल्या सुधीर मुनगंटीवार यांना संधी देण्यात आली आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून सुधीर मुनगंटीवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर, माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करुन, आणि चंद्रपूरची आई महाकालीचे दर्शन घेऊन आम्ही आज सुधीर मुनगंटीवार यांचा फॉर्म भरला आहे. आज नवी सुरुवात झाली असून शेवटही चांगलाच होईल. महाराष्ट्रात आम्ही आमचचे सर्व जुने रेकॉर्ड मोडू, असा विश्वासही फडणवीसांनी यावेळी व्यक्त केला आहे. तसेच, ही राज्याची निवडणूक नाही, तर ही देशाची निवडणूक आहे. देश कोणाला सोपवायचे आहे, देशात राज्य कोणाचा आणायचा, मोदींचा की राहुल गांधींचा याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे. सुधीर मुनगंटीवार यांना दिलेलं मत मोदींना दिलेलं मत ठरेल, असेही फडणवीस यांनी म्हटले.
दरम्यान, चंद्रपूर लोकसभेसाठी सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्यात थेट लढत आहे. काँग्रेसने गत लोकसभा निवडणुकीत चंद्रपूरची जागा जिंकली होती. येथून सुरेश धानोकर यांनी विजय मिळवला होता. मात्र, काही महिन्यांपूर्वी त्यांचे निधन झाले. त्यामुळे, या जागेवर काँग्रेसने त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या जागेसाठी काँग्रेसकडून शिवानी वडेट्टीवार आणि विजय वडेट्टीवार यांचेही नाव चर्चेत होते. मात्र, प्रतिभा धानोरकरांनी दिल्ली वारी केल्यानंतर, त्यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.