बल्लारपूर : येथील नगरपालिकेच्या प्रभाग दोन मधील भाजपाचे नगरसेवक राकेश कुळसंगे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेची पोटनिवडणूक रविवारला घेण्यात आली. मतमोजणी सोमवारला नगरपालिकेच्या सभागृहात सकाळी ९ वाजता पार पडली. यात बसपाचे गणेश कोकाटे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार भारिप बहुजन महासंघाचे प्रशांत झामरे यांच्यावर २६६ मतांच्या फरकाने विजय मिळवला. ही जागा बसपाने भाजपाकडून हिरावली.पोटनिवडणुकीसाठी एकुण ११ उमेदवारांनी निवडणुकीत नशिब अजमावले. भाजपाने ही जागा आपल्याकडे कायम ठेवण्यासाठी जेष्ठ नेते चंदनसिंह चंदेल यांच्या बहिण किरण साधुसिंह चंदेल यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. त्यांच्या माध्यमातून नगरपालिकेत सत्ता काबिज करण्याचा मनसुबा रचला होता. मात्र या प्रभागातील मतदारांनी त्यांना नाकारले. किरण चंदेल यांना केवळ ९६८ मते मिळाल्याने व त्यांची तिसऱ्या स्थानावर घसरगुंडी झाल्याने भाजपाचा पुरता भ्रमनिराश झाला. काँग्रेसचे उमेदवार अलताफ हाजी युनुस यांना केवळ ६४५ मतांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत बसपाचे गणेश कोकाटे यांना एक हजार ६४७ मते, भारिप बहुजन महासंघाचे प्रशांत झामरे यांनी एक हजार ३८१ मते, भाजपाच्या किरण चंदेल यांना ९६८ मते, काँग्रेसचे अलताफ हाजी युनुस ६४५ मते, शिवसेनेचे अमीत शाहु ५८८ मते, अपक्ष राहुल मोरे ५८५ मते, महमद जाफर १९२ मते तर राष्ट्रवादीच्या निर्मलादेवी यांना १५ मतावर समाधान मानावे लागले. (शहर प्रतिनिधी)
बल्लारपुरात झाला भाजपचा भ्रमनिरास
By admin | Published: January 20, 2015 12:03 AM