कृती समितीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन : चिमूर क्रांती जिल्हा झालाच पाहिजेचिमूर : चिमुरातील नागरिकांनी ५ जानेवारी २००२ रोजी काढलेल्या सर्वपक्षीय मोर्चादरम्यान तहसील कार्यालयाची जाळपोळ करण्यात आली होती. त्यामध्ये अनेकांना तुरूंगवास झाला. त्या तुरूंगवासाचा निषेध म्हणून चिमूर जिल्हा कृती समितीच्या वतीने ५ जानेवारी या दिवसाला ‘काळा दिन’ म्हणून पाळला जातो. या दिवसाचे औचित्य साधून चिमूर जिल्हा कृती समितीच्या वतीने ‘चिमूर जिल्हा झालाच पाहिजे’, यासाठी कृती समितीचे अध्यक्ष नरेंद्र बडे व स्वातंत्र संग्राम सैनिक दामोधर काळे यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.देशाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी झालेल्या चळवळीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या चिमूर नगरीतील क्रांतिकारकांनी गेल्या ३७ वर्षांपासून चिमूरला क्रांती जिल्हा घोषित करण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यासाठी स्वातंत्र संग्राम सैनिकासह सर्वपक्षीय राजकीय पुढाऱ्याकडून अनेक आंदोलने करण्यात येत आहेत. मात्र सत्ताधाऱ्यांकडून आश्वासनापलीकडे काहीच मिळत नाही. चिमूर क्रांती जिल्ह्याची मागणी शासनाकडे रेटण्यासाठी चिमूरकरांनी सर्वपक्षीय कृती समितीची स्थापना केली आहे.सर्वपक्षीय चिमूर जिल्हा कृती समितीच्या वतीने ५ जानेवारी २००२ रोजी तहसील कार्यालयावर जिल्ह्याच्या मागणीकरिता मोर्चा काढला होता. या मोर्चातील जमावाने संतप्त होवून तहसील कार्यालयाची जाळपोळ केली होती. त्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. त्यामुळे ५ जानेवारी या दिनाला कृती समितीकडून ‘काळा दिन’ म्हणून पाळण्यात येते. मात्र याच दिनाचे औचित्य साधून चिमूर जिल्हा कृती समितीतर्फे प्रत्येक वर्षी मुख्यमंत्री व प्रशासनाला निवेदन देण्यात येते. गुरूवारी निवेदन देताना कृती समितीचे अध्यक्ष नरेंद्र बंडे, स्वातंत्र्य संग्राम सैनिक दामोधर काळे (गुरुजी), सुनील मैद, तालुका काँग्रेस अध्यक्ष माधव बिरजे, रमेश कराळे, किशोर सिंगरे, कृष्णा तपासे, गजानन बुटले, लता अगडे, सुरेखा अयरगडे, राजेंद्र लोणारे, इकलाख कुरेशी, गजानन अगडे, मनीष नंदेश्वर, ओम खैरे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)९४ वर्षांच्या तरुणाची जिल्ह्यासाठी तळमळ१६ आॅगस्ट १९४२ च्या चिमूर स्वातंत्र लढ्यातील स्वातंत्रसंग्राम सैनिक दामोधर काळे (गुरुजी) यांनी चिमूर क्रांती जिल्ह्याची मागणी प्रथम केली होती. ती मागणी आता चिमूर ताुलक्यातील लहानापासून म्हाताऱ्यांपर्यंतची झाली असून त्यासाठी अनेक आंदोलने करण्यात येतात. सर्व आंदोलनात हिरीहिरीने सहभागी होणारे काळे गुरुजी आजघडीला ९४ वर्षांत पोहचले आहेत. मात्र प्रत्येक आंदोलनात सक्रीय असलेल्या गुरुजींची जिल्ह्यासाठी असलेली तळमळ त्यांच्या उपस्थितीमधून चिमूरकरांच्या लक्षात येते. जिल्ह्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करण्याची खुणगाठ काळे गुरुजीनी बांधल्याचे उपस्थित बोलून दाखवितात.
चिमूरकरांनी पाळला काळा दिन
By admin | Published: January 07, 2017 12:43 AM