चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात दररोज पर्यटकांच्या दृष्टीने काहीना काही घडत आहे. आधी बिबट्याचे दोन काळे बछडे, त्यानंतर माया वाघिणीसाठी रुद्र आणि बलराम या दोन वाघांची झुंज व्हायरल झाली. आता पुन्हा एकदा काळा बिबट्या चर्चेत आला, तो हरणाच्या शिकारीने. हा व्हिडीओदेखील चांगलाच व्हायरल होत आहे.
काळ्या बिबट्याने हरणाची शिकार केली. तो ती शिकार घेऊन जाण्याच्या बेतात असतानाच त्याला दुसरा बिबट्या त्या ठिकाणी येत असल्याचे दिसते. त्यानंतर काळा बिबट्या तोंडात असलेली हरणाची मान सोडतो. हरिण खाली पडते आणि तो तेथून पळ काढतो. इतक्यात त्या ठिकाणी दुसरा बिबट्या येतो आणि आयती शिकार घेऊन निघून जातो. आयत्या बिळात नागोबा बनलेल्या दुसऱ्या बिबट्याने काळ्या बिबट्याच्या तोंडचा घास पळविल्याचे दिसून येते. हा व्हिडीओ ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहर्ली परिसरातील असल्याचे बोलले जात आहे.
बुधवारी रात्रीच्या सफारीदरम्यान शिकारीचा हा थरार पर्यटकांना बघायला मिळाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत दुजोरा मिळाला नाही. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प बफरचे उपसंचालक कुशाग्र पाठक यांनीही याबाबत माहिती घेऊनच सांगता येईल, असे सांगितले. हा व्हिडीओ ताडोबातील आहे वा नाही, हेही सांगता येत नसल्याचे सांगितले. मात्र, हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे.