किराणा व्यवसायिक गुंतले - लगतच्या तेलंगणा राज्यात पुरवठा
गोंडपिपरी : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील गोंडपिपरी तालुक्याला तेलंगणा राज्याची सीमा लागून आहे. याचाच गैरफायदा घेत गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक शहरातील व सीमावर्ती भागातील नागरिकांनी सुगंधित तंबाखूचा काळाबाजार करीत थेट तेलंगणा राज्यासह गडचिरोली जिल्ह्यात पुरवठा करण्याचा गोरखधंदा चालविला आहे. किराणा व्यवसायाच्या आड सुरू असलेल्या या अवैध धंद्याकडे मात्र प्रशासनाचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.
महाराष्ट्र व तेलंगणा या दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागातून वाहणाऱ्या वर्धा नदीवर पुलाची निर्मिती होताच सदर दोन्ही राज्य अंतर्गत वाहतुकीचा प्रश्न निकाली लागला. यामुळे तेलंगणा राज्यातील सीमावर्ती भागातील व्यावसायिकांची स्थानिक शहरातील व्यापाऱ्यांशी व्यापार संबंध प्रस्थापित झाले. तेलंगणा राज्यात सुगंधित व साध्या तंबाखूची मागणी अधिक प्रमाणात असल्याने याचाच गैरफायदा घेत गोंडपिपरी येथील काही किराणा व्यावसायिक तसेच सीमावर्ती भागातील काही नागरिकांनी थेट तेलंगणा राज्यात सुगंधित तंबाखू काळाबाजार करीत पुरवठा करणे सुरू केले. गतवर्षी व यंदाचे वर्षी राज्य शासनाने टाळेबंदी केली. याचा गैरफायदा घेत चढ्या भावाने सुगंधित तंबाखूचा मोठ्या प्रमाणात साठा पुरवठा करून शहरातील व्यापाऱ्यांनी प्रचंड माया जमवल्याची माहिती हाती आली आहे. चक्क किराणा साहित्याच्या वाहनातून सदर तंबाखू पुरवठा करण्याचा गोरखधंदा चालविणाऱ्या स्थानिक व्यापाऱ्यांवर आजवर अन्न औषध प्रशासन तथा पोलीस विभागाने थातुरमातुर कारवाई करून मोकळे झाले. संपूर्ण परिसरात अगदी राजरोसपणे पान टपरी धारक व इतर किरकोळ व्यावसायिक सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करतात.
बॉक्स
पोळसा गाव बनले केंद्र
आजघडीला तालुक्यातील पोळसा हे तेलंगणा राज्यात सुगंधित तंबाखूचा पुरवठा करणारे केंद्र बनले असून थेट बल्लारपूर येथून गोंडपिपरी तालुक्यात मुबलक प्रमाणात सुगंधित तंबाखू व अन्य तंबाखूजन्य पदार्थांच्या साठा दैनंदिन वाहतुकीने सुरळीत सुरू असल्याचीही विश्वसनीय माहिती आहे. यासंबंधी संबंधित विभागाने जातीने लक्ष देऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.