खातेदारांच्या चौकशीसाठी वर्ष लागेल : भाजप प्रदेश प्रवक्त्यांची माहिती लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी केंद्र शासनाने नोट बंदी केली. त्यामुळे अनेकांनी काळा पैसा पांढरा करण्यासाठी जनधन खात्याचा व इतर साधनांचा वापर केला. मात्र काळा पैसा ठेवणारे प्राप्तीकर विभागाच्या रडारवर असून त्यांची चौकशी करून नावे घोषित करण्यास जवळपास आणखी एक वर्षांचा कालावधी लागेल, अशी माहिती भाजप पक्षाचे प्रदेश प्रवक्ते विश्वास पाठक यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या वर्षशताब्दीनिमीत्त केंद्र सरकार तसेच राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी उपक्रम राबविण्यात येत आहे. यानिमीत्त पक्षाचे प्रदेश प्रवक्ते विश्वास पाठक चंद्रपुरात आले असता, पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी केंद्र शासनाने तीन वर्षाच्या कार्यकाळात राबविलेल्या योजनांची माहिती देऊन शासनाने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, काळा पैसा रोखण्यासाठी एसआयटीची स्थापना करून विदेशात हवालाच्या माध्यमातून जाणाऱ्या पैशावर बंदी आणण्यात केंद्र सरकारला यश आले.याचबरोबर शासनाने जीएसटीसारखा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे.या निर्णयाचे भविष्यात सकारात्मक परिणाम दिसणार असल्याचेही ते म्हणाले. तसेच दोन कोटी रोजगाराची निर्मीती, मुद्रा कर्ज योजना, जनधन योजनेबाबत माहिती दिली. नोटाबंदी दरम्यान किती जणांनी जनधन खात्यात पैसे जमा केले, या प्रश्नाला उत्तर देताना काळा पैसा बाळगणारे प्राप्तीकर विभागाच्या रडारवर असून त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांची चौकशी करून केंद्र शासन त्यांची नावे जाहीर करणार आहे. आता मात्र किती जणांनी जनधन खात्यात पैसा जमा केले, याचा निश्चीत आकडा सांगता येणार नाही, असे सांगितले. पत्रकार परिषदेला जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, ज्येष्ठ नेते विजय राऊत, रामपाल सिंग यांची उपस्थिती होती.
काळा पैसा ठेवणारे प्राप्तीकर विभागाच्या रडारवर
By admin | Published: June 06, 2017 12:31 AM