खासगी वाहतुकीकडे प्रवाशांचा कल : ‘स्पीड लॉक’ पद्धती बंद करण्याची मागणीचंद्रपूर : चढ आला की गोंगाट करून एसटीची बस कशीबशी तो चढ पार करते. बाजुने जाणारी खाजगी प्रवाशी वाहतुकीची बस सुसाट वेगाने निघुन जाते. एसटीच्या बसमध्ये बसलेले प्रवासी बसच्या चालक-वाहकाशी भांडण करून गाडीचा वेग वाढविण्यास सांगतात. परंतु ‘स्पीड लॉक’ केल्यामुळे त्यांचाही नाईलाज होतो. यामुळे महामंडळाचे प्रवासी खाजगी प्रवाशी वाहतुकीकडे वळत असून एसटीच्या कासवगतीमुळे महामंडळाच्या उत्पन्नावर थेट परिणाम होत आहे. एसटी महामंडळाच्या चंद्रपूर विभागात चंद्रपूर, राजुरा, वरोरा हे तीन आगार आहेत. या आगारातून दररोज शेकडो बसफेऱ्या धावतात. या सर्व बसेसचा वेग ताशी ६० किलोमिटरवर बांधण्यात आला आहे. हा वेग बांधताना एसटी महामंडळ चुकीच्या पद्धतीने ‘स्पीड लॉक’ करीत असल्यामुळे महामंडळाच्या बसेस इतर प्रवाशी वाहतुकीच्या तुलनेत अतिशय कमी वेगाने धावतात. प्रवाशांना कमी वेळात आपल्या नियोजित स्थळी पोहोचणे गरजेचे असते. परंतु प्रवाशांची ही मागणी महामंडळ पूर्ण करण्यात सपसेल अपयशी ठरत आहे. उलट महामंडळाच्या स्पीड लॉक करण्याच्या धोरणामुळे एसटीचे प्रवासी खाजगी वाहतुकीकडे वळत असून याचा परिणाम थेट एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर होत आहे. अनेकदा प्रवाशी महामंडळाच्या बसचा वेग कमी असल्यामुळे चालकाच्या माथी त्याचे खापर फोडून त्याच्याशी वाद घालतात. यामुळे एसटी महामंडळाच्या चालकांमध्येही या स्पीड लॉक पद्धतीविषयी संताप व्यक्त करण्यात येत आहे. एसटी महामंडळातील कर्मचारी संघटनांनी अनेकदा हा प्रश्न एसटी महामंडळाच्या प्रशासनाकडे लाऊन धरला, परंतु महामंडळाचे प्रशासन या बाबत काहीच पाऊल उचलण्यास तयार नाही. त्यामुळे स्पीड लॉक पद्धती बंद करून एसटीची कासवगती न वाढविल्यास भविष्यात एसटी महामंडळाचे प्रवासी एसटी बसमध्ये बसण्याचे टाळून खाजगी वाहतुकीकडे वळतील, अशी शंका व्यक्त केली जात आहे. याकडे वेळीच लक्ष देण्याची मागणी प्रवासी मित्र मंडळाकडून केली जात आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
‘स्पीड लॉक’मुळे उत्पन्न ‘ब्लॉक’
By admin | Published: July 13, 2015 1:13 AM