लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सीसीआयद्वारे शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केल्या जात नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी गुरुवारी चंद्रपूर - आदिलाबाद महामार्ग रोखून धरत चक्काजाम आंदोलन सुरू केले. यामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या. तत्काळ कापूस खरेदी करावा. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला.मागील अनेक दिवसांपासून कापूस विक्रीकरिता शेतकरी सीसीआय केंद्राजवळ भरलेल्या कापसाच्या बैलबंडी व मिनीडोअर रांगेत लावून ठेवत आहेत. आपला कापूस केव्हा विकला जाईल, याकडे शेतकरी नजरा लावून आहेत. काही शेतकऱ्यांच्या गाडया लागून कापूस विक्रीसुद्धा सुरू होती.मात्र अचानक दोन दिवस कापूस विक्री केंद्र बंद राहणार असे सांगण्यात आले. याबद्दल कोणतीही माहिती शेतकऱ्यांना पुरविण्यात आली नाही. बंद असले तरीदेखील सीसीआय केंद्रात काही मोजक्या लोकांच्या गाडया घेण्यात आल्या. मात्र गुरुवारी शेतकरी आपला कापूस विक्रीकरिता गेले असता सीसीआय कर्मचाऱ्यांनी थेट नकार देत कापूस घेतला जाणार नाही. केंद्र बंद आहे, असे सांगितले. केंद्राच्या अरेरावी धोरणावर रोष व्यक्त करत शेतकऱ्यांनी राजुरा-आदिलाबाद मार्ग कोरपना तालुक्यातील सोनुर्ली या गावाजवळ रोखून धरत चक्काजाम आंदोलन केले. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे एकच खळबळ उडाली. रस्ता रोखल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजुला वाहनांच्या रांगा लागल्या. दरम्यान, आपला कापूस खरेदी करणार नाही, तोपर्यंत हे चक्काजाम आंदोलन असेच येथे सुरू राहणार, असे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सांगितले.