सावरगाव : नागभीड तालुक्यातील वाढोणा येथील ग्रामपंचायत व जगदंब युवा ग्रुप वाढोणा यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. अशातच आता शासनाने १८ ते ४४ वयोगटातील कोविड लसीकरण सुरु केल्याने साधारणता सहा महिन्यांपर्यंत रक्ताचा फार मोठा तुटवडा भासणार आहे. ही बाब लक्षात घेऊन ग्रामीण भागातील नागरिकांना रक्ताची गरज भासल्यास ते मिळवून देता यावे, या उद्देशाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले.
रक्तदान शिबिराची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार करुन करण्यात आली. यावेळी सरपंच देवेंद्र प्रेमदास गेडाम, वाढोणा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.राहुल डोर्लीकर, उपसरपंच भगवान बन्सोड, सामाजिक कार्यकर्ते रुपेश डोर्लीकर, ग्रा. पं. सदस्य अनिल डोर्लीकर, जगदंब युवा ग्रुपचे अध्यक्ष राहुल मरस्कोल्हे आदींची उपस्थिती होती.
रक्तदात्यांना ग्रामपंचायत व जगदंब युवा ग्रुप वाढोणाकडून प्रमाणपत्र, फळे, ड्रायफुड्स देण्यात आले. यशस्वीतेसाठी पराशर पगाडे, समीर सूर्यवंशी, विजय काळेवार, गुरुदास पुस्तोडे व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी सहकार्य केले.