लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : काेरोनामुळे महाराष्ट्रासह देशभरात रक्ताची मागणी प्रचंड वाढली आहे. रक्तदानातून ही चणचण दूर करण्यात मोलाचा हातभार लागावा, या हेतूने लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक व स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंती निमित्ताने ‘लोकमत रक्ताचं नातं’ ही रक्तदानाची भव्य मोहीम हाती घेतली आहे. चंद्रपुरात शुक्रवारी २ जुलै रोजी बाबूजी यांची जयंती व डाॅक्टर्स डेनिमित्त या मोहिमेचा भव्य शुभारंभ इंडियन मेडिकल असोसिएशन सभागृह, गंजवाॅर्ड चंद्रपूर येथे सकाळी १० वाजता होणार आहे.लोकमत वृत्तपत्र समूहाच्या पुढाकारात जिल्हा सामान्य रुग्णालय तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर, इंडियन मेडिकल असोसिएशन, इंडियन रेडक्राॅस सोसायटी व सोमय्या पाॅलिटेक्निक चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदानाच्या या महायज्ञात रक्तदान करण्यासाठी शहरातील रक्तदात्यांसह विविध सामाजिक व स्वयंसेवी संघटनांनी आपली नोंदणी केलेली आहे. हे शिबिर दुपारी २ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात प्रत्येकांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात हातभार लावावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
महाराष्ट्रासह जिल्ह्यालाही रक्ताची गरज : डाॅ. अनंत हजारेकोरोना झाला, अशा रक्तदात्यांना २८ दिवसांनंतर तर ज्यांनी कोविड लस घेतली आहे, असे रक्तदाते १४ दिवसांनंतर रक्तदान करू शकतात. रक्तदानाबाबत भीती बाळगू नये, अशी माहिती जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी डाॅ. अनंत हजारे यांनी दिली. ‘लोकमत’ने हाती घेतलेला हा उपक्रम महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कृत आहे. महाराष्ट्रासह चंद्रपूर जिल्ह्यालाही मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज आहे. आपण केलेल्या रक्तदानामुळे कोणालाही ऐनवेळी रक्त न मिळाल्यामुळे जीव गमवावा लागणार नाही. कोरोनाच्या या संकटात रक्तदानाचे महत्त्व वाढले आहे. या शिबिरात प्रत्येक रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून रक्ताची उणीव भरून काढावी, असे आवाहनही डाॅ. हजारे यांनी केले आहे.