चंद्रपूर : माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रपूर जिल्हा एनएसयूआयच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राजीव गांधी सभागृहात आयोजित रक्तदान शिबिरात एनएसयूआय चंद्रपूर जिल्ह्याचे निरीक्षक मारका अभिनय गौड, विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे शहराध्यक्ष तसेच नगरसेवक देवेंद्र बेले, एनएसयूआय चंद्रपूर जिल्हाध्यक्ष स्वप्निल तिवारी, कामगार युनियनचे नेते गजानन दिवसे यांनी रक्तदान केले.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना नरेश पुगलिया म्हणाले, राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान, संगणक युगाचे उद्गाता ठरले. पंचायतराजच्या माध्यमातून त्यांनी शेवटच्या घटकांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला. विज्ञान, कृषी, सिंचन, उद्योग, शिक्षण, संरक्षण आदी सर्वच क्षेत्रात त्यांनी सर्वोच्च टप्पे गाठण्याचे व देशाला महासत्ता बनविण्याचे प्रयत्न त्यांच्या काळात झाल्याचे सांगितले. जिल्हा सामान्य रुग्णालयाचे रक्तपेढी अधिकारी डाॅ. अनंता हजारे यांच्या मार्गदर्शनात डाॅ. अंकुश चिचडे, डाॅ. पंकज पवार, उत्तम सावंत यांनी सहकार्य केले. यावेळी किसान मजदूर काँग्रेसचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.