चंद्रपूर : शहर महानगरपालिकेच्या झोन १ कार्यालयात मंगळवारी रक्तदान शिबिर पार पडले. शिबिराला मनपा कर्मचारी व प्रभागातील नागरिकांनी देखील उत्तम प्रतिसाद देत रक्तदानास स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेतला. आयुक्त राजेश मोहिते यांनी शिबिराला भेट देऊन स्वतः रक्तदान केले.
महापौर राखी कंचर्लावार, स्थायी समिती सभापती रवी आसवानी यांनी शिबिर स्थळी भेट दिली. डेंग्यूच्या साथीचा प्रादुर्भाव असताना रक्ताची कमतरता जाणवू नये, हा या रक्तदान शिबिराचा मुख्य हेतू असल्याचे महापौर राखी कंचर्लावार यांनी सांगितले. डेंग्यू-मलेरिया या साथ रोगांपासून बचावासाठी महापालिका प्रशासनातर्फे वेळोवेळी देण्यात येण्याच्या आरोग्यविषयक सूचनांचे पालन व वैयक्तिक खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. यावेळी झोन १ च्या सभापती छबूताई वैरागडे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार, डॉ. अतुल चटकी आदी उपस्थित होते.