चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून राज्यात शासकीय आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही संतापजनक प्रकार रक्तदात्यांसोबत घडत आहे. रक्त देण्यासाठी गेल्यानंतर त्यांना तब्बल दोन-दोन तास ताटकळत बसावे लागत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या विविध रक्तदूतांच्या फाउंडेशनने प्रशासनाला जागे करण्यासाठी निवेदन देत समस्या सोडविण्याची मागणी केली आहे.
औद्योगिक जिल्हा असल्याने जिल्ह्यात रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये विशेषत: अपघात तसेच विविध आजारांच्या रुग्णांची संख्या अधिक असते. या रुग्णांना वेळोवेळी रक्ताची गरज भासते. अशावेळी शासकीय रक्तपेढीकडे रुग्ण जातात. मात्र, रुग्णांच्या नातेवाइकांना रक्तासाठी रक्तदात्यांना न्यावे लागते किंवा रक्तासाठी शासकीय रेटनुसार अधिकचे पैसे मोजावे लागतात. अशावेळी रुग्णांचे नातेवाईक रक्तदात्यांना पाचारण करतात. मात्र रक्तपेढीमध्ये अनेक वेळा कर्मचारी, डॉक्टर उपस्थित राहत नसल्याने रक्तदात्यांना ताटकळत राहावे लागते.
दुसरीकडे वेळीच रुग्णाला रक्त मिळत नसल्याने त्याचा जीवही धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीमधील समस्या त्वरित सोडवाव्या, अतिरिक्त डॉक्टर, कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, रुग्णांना वेळेत रक्त द्यावे या मागणीला घेऊन जिल्ह्यातील विविध रक्त फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी ब्लड बँक अधिकारी डॉ. जीवने, डॉ. प्रेमचंद यांना निवेदन दिले. ही गंभीर समस्या असून त्वरित सोडविण्याचे आश्वासन यावेळी उपस्थित डॉक्टरांनी दिले.