पर्यावरणप्रेमींची मागणी : उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनलोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : शेतामध्ये बेजबाबदारपणे आग लावण्यात येते. अशा आगी लावणाऱ्यांवर आळा बसावा, यासाठी पर्यावरण समितीचे अध्यक्ष कवडू लोहकरे, पर्यावरण प्रेमी राकेश राऊत, अतम मेश्राम, नितेश दोडके, मनी राय यांच्या नेतृत्वात चिमूरचे उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांना निवेदन देण्यात आले.उन्हाळी हंगाम संपत आला असून शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. सर्वप्रथम शेतातील काटे, अनावश्यक झुडुपे व इतर इजा पोहोचविणारे वृक्ष जाळण्यासाठी आगीचे वनवे लावतात. त्या आगीमुळे शेतातील झाडांचा राखरांगोळी होत आहेत. आगीमुळे सुमारे १००० ते २००० च्या आसपास झाडे जळून खाक झाली आहेत. त्यामुळे त्याचा विपरित परिणाम पर्यावरणावर होत आहे. अशा प्रकारचे विदारक चित्र चिमूर तालुक्यात पाहायला मिळत आहे.दिवस संपत आला की रात्रीच्या वेळेस शेतकरी शेतामध्ये वनवा लावून घराकडे निघून जातात. त्यामुळे शेतातील झाडे जळून खाक होण्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. त्याचबरोबर त्या झाडावर असणारे पशुपक्षी यांचा निवारा हरपला असून त्यांचा राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतात वनवा लावल्यानंतर तो वनवा शेतामधून इतरत्र जंगलाकडे वळतो आणि त्यामुळे जंगलाला आग लागून जंगलाची राख रांगोळी होण्याच्या घटना घडत असतात.या वनव्यामुळे पशुपक्षी, वन्यजीव व इतर सरपटणाऱ्या प्राण्यांना धोका पोहोचत असल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम पर्यावरणावर होत आहे. बेजबाबदारपणे वनवे लावणाऱ्यावर आळा बसावा, यासाठी काहीतरी ठोस पावले उचलण्याची गरज आहे. त्यामुळे चिमूर येथील उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देवून शासनाकडे याबाबत पाठपुरावा करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.शेतकऱ्यांनी स्वत: हजर राहून अनावश्यक झुडपे जाळल्यास वनवा इतरत्र पसरणार नाही आणि जंगल पेटणार नाही, असे वन्यप्रेमींचे म्हणणे आहे.
शेतामध्ये आग लावणाऱ्यांवर आळा घाला
By admin | Published: May 14, 2017 12:36 AM