लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो वर्षांचा अंधार दूर करून उपेक्षित व वंचितांना प्रकाशाचा मार्ग दाखविला. विषमतेच्या बेड्या तोडून अस्मिता जागवली. ‘शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा’ या संदेशाने प्रगतीच्या दिशा दाखविल्या. बौद्ध धम्म क्रांतीने तर नवा इतिहास घडविला. बाबासाहेबांनी चंद्रपुरात लाखो जनतेला बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. या ऐतिहासिक दिनानिमित्त दीक्षाभूमी परिसरात मंगळवारी धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याचे भंते ज्ञानज्योती महास्थवीर यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झाले. सायंकाळी पाच वाजता शहरात निघालेली विश्वशांती धम्मज्योत रॅली नागरिकांसाठी लक्षवेधी ठरली.अध्यक्षस्थानी अरूण घोटेकर तर प्रमुख अतिथी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जि. प. मुख्य कार्यपालन अधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते विश्वशांतीचा संदेश देणारा पंचरंगी बलून आकाशात सोडण्यात आला. यावेळी भंते कृपाशरण, भंते शिलानंद वर्धा, भंते आर्यसुत्त नागपूर, भंते सरणकर नागपूर, भिक्खुनी खेमा, सचिव वामनराव मोडक, प्राचार्य डॉ. राजेश दहेगावकर आदींची उपस्थित होती.भंते ज्ञानज्योती महास्थवीर म्हणाले, जीवनात पंचशीलाचे पालन करायला पाहिजे. मनुष्याचे जीवन आनंदमय व सुखमय होण्यासाठी मनाची शुद्धी आवश्यक आहे. धम्म विचारात वैज्ञानिक दृष्टी आहे. त्यामुळेच हा विचार वैश्विक झाला. भंते कृपाशरण म्हणाले, बुद्धाचा धम्म माणसाने माणसावर प्रेम करायला शिकवितो. मानवाच्या विकासाकरिता धम्माचे पालन केले पाहिजे. भंते शिलानंद म्हणाले, या देशात समता स्वातंत्र्य व लोकशाही निर्माण करण्यासाठी बुद्ध धम्माशिवाय पर्याय नाही. त्यासाठीच बाबासाहेबांनी बौद्ध धम्म दिला. अध्यक्ष घोटेकर यांनी समारंभाचे महत्त्व विशद केले. संचालन प्रा. रवी कांबळे यांनी केले. उद्घाटन सत्रानंतर सांस्कृतिक कार्यक्रम झाला. ‘क्रांतीज्योती’ महात्मा जोतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित अभिनयसुत्रम अॅक्टींग क्लासेसने लघु नाटिका सादर केली. हेमंत शेंडे व संचाने ‘जागर समतेचा’ या कार्यक्रमाद्वारे प्रबोधन केले. स्फुर्ती गीत सादर केली. त्यानंतर भंते ज्ञानज्योती महास्थवीर यांनी उपस्थित जनसमुहाला त्रिशरण व पंचशील दिले. संस्थेचे उपाध्यक्ष मारोतराव खोब्रागडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.देशभरातील वैचारिक ग्रंथसंपदाधम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्यात विविध विषयांच्या पुस्तकांचे स्टॉल लावण्यात आले. महाराष्ट्रासह देशभरातील पुस्तक विक्रेते यंदाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. यंदा भोजन व दुकानाचे स्टॉल चांदा क्लब ग्राउंडवर लागले आहेत.आजचे कार्यक्रम१६ आॅक्टोबर रोजी सकाळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशासह बौद्ध भिक्खूंच्या उपस्थितीत धम्मरॅलीनिघणार आहे. सकाळी ९ वाजता ‘धम्मक्रांती व धम्मदीक्षेची प्रासंगिकता’ विषयावर परिसंवाद होणार आहे. यावेळी भंते आर्य नागार्जून सुरेई ससाई, भंते धम्मसारथी, भंते नागवंशा, भंते धम्मप्रकाश आदी विचार मांडतील. सायंकाळी ५ वाजता मुख्य सोहळा होणार आहे. अध्यक्षस्थानी अरूण घोटेकर व प्रमुख पाहुणे निवृत्त सनदी अधिकारी श्याम तागडे, भंते ज्ञानज्योती महास्थवीर, ज्येष्ठ विचारवंत डॉ. बी. ए. चोपडे, डॉ. आनंद भालेराव, आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक डॉ. शैलेंद्र लेंडे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, समाज कल्याण अधिकारी सुनील जाधव उपस्थित राहतील. रात्री ९ वाजता गायिका वैशाली माडे बुद्ध-भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करणार आहेत.
चंद्र्रपुरातील ऐतिहासिक दीक्षाभूमीवर अवतरली निळाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 6:00 AM
भंते ज्ञानज्योती महास्थवीर म्हणाले, जीवनात पंचशीलाचे पालन करायला पाहिजे. मनुष्याचे जीवन आनंदमय व सुखमय होण्यासाठी मनाची शुद्धी आवश्यक आहे. धम्म विचारात वैज्ञानिक दृष्टी आहे. त्यामुळेच हा विचार वैश्विक झाला. भंते कृपाशरण म्हणाले, बुद्धाचा धम्म माणसाने माणसावर प्रेम करायला शिकवितो.
ठळक मुद्देधम्मज्योत लक्षवेधी : धम्मचक्र अनुप्रवर्तन समारोहाचे उद्घाटन