देवाडा खुर्द : पोंभुर्णा तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये अधिकृत वैद्यकीय प्रमाणपत्र नसलेल्या बोगस डॉक्टरांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या बोगस डॉक्टरांच्या व्यवसायामुळे ग्रामीण परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला आहे.ग्रामीण भागात जनतेच्या आरोग्याशी संबंधित शासनाच्या पुरेशा सोयी उपलब्ध नसल्यामुळे अशा बोगस डॉक्टरांकडेच जनतेला उपचाराकरिता जावे लागते. राज्यात कोठेही वैद्यकीय व्यवसाय करावयाचा झाल्यास इंडियन मेडीकल असोसिएशन या संघटनेचे प्रमाणपत्र आवश्यक असते. परंतु असे कोणत्याही प्रकारचे प्रमाणपत्र नसताना बरेच बोगस डॉक्टर आपला व्यवसाय करीत आहेत. तर काही डॉक्टर शहरातील डॉक्टरांकडे कंपाऊडर म्हणून नोकरी करुन नंतर ग्रामीण परिसरामध्ये येऊन आपला स्वत:चा व्यवसाय करीत आहेत. अशा डॉक्टरांना कोणत्या औषधीचे काय परिणाम होतात. कोणत्या औषधीवर शासनाने बंदी घातली आहे, याची त्यांना माहिती नसते. बोगस वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉक्टर ग्रामीण भागात अनधिकृतपणे मुळव्याध, भगंदर यासारख्या रोगांवर शस्त्रक्रियेशिवाय उपचार करीत आहेत. काही डॉक्टर बॉम्बे मार्केटच्या दुय्यम दर्जाच्या औषधीचा वापर करुन लालसेपोटी मोठ्या प्रमाणात पैसा कमविण्याचा गोरखधंदा करीत आहेत. बऱ्याच ठिकाणी बोगस डॉक्टरांविरुद्ध कठोर मोहीम राबविली आहे. परंतु पोंभुर्णा तालुक्यात मात्र शासनाने बोगस डॉक्टरांना व्यवसाय करण्यासाठी मोकाट सोडल्याचे दिसून येत आहे.ग्रामीण भागात शासनाच्या वैद्यकीय सेवा पुरेशा प्रमाणात मिळत नाही. विविध भागातील आरोग्य केंद्रामध्ये तथा उपकेंद्रामध्ये डॉक्टर, कर्मचारी तथा औषधसाठा पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध राहत नाही. त्यामुळे स्थानिक परिसराततील रुग्णांना अशा प्रकारच्या बोगस डॉक्टरांकडून नाईलाजास्तव उपचार करवून घ्यावा लागतो. त्यामुळे परिसरात अवैध धंदा करणाऱ्या डॉक्टरांचा व्यवसाय फोफावत आहे. पोंभुर्णा तालुक्यातील उमरी पोतदार, डोंगरहळदी तुकूम, सातारा तुकूम, जामखुर्द, जामतुकूम, देवाडा खुर्द, येरगाव, पोंभुर्णा, नवेगाव मोरे, चिंतलधाबा, चेकहलीबोडी, बोर्डा वेळवा या ठिकाणी बोगस व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांवर तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत कारवाई करण्याची मागणी परिसरातील जनतेकडून केली जात आहे. (वार्ताहर)
बोगस डॉक्टरांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
By admin | Published: October 25, 2014 10:37 PM