आंबोली : येथून जवळ असलेल्या वाकर्ला, जवराबोडी, साठगाव, चिचाळा व अन्य गावातील अनेक शेतकऱ्यांना शंकरपूर येथील एका कृषी केंद्रातून लाखो रुपयांची बोगस खते विकली. याप्रकरणी दत्त कृषी केंद्र संचालक राजू वैद्य यांच्यावर खतात भेसळ केल्याबद्दल गुन्हा दाखल करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यात यावी, अशी मागणी जवराबोडी व परिसरातील ११ शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारीद्वारे केली आहे. प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, शेतकऱ्यांना न्याय न दिल्यास येत्या हिवाळी अधिवेशनात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांनी शंकरपूर येथील दत्त कृषी केंद्रातून इफको कंपनीची १८ : ४६ व १०:२६:२६, गोदावरी कंपनीचे १८:४६ ही दोन प्रकारची खते विकत घेतली. धान, कापूस, सोयाबीन इत्यादीसाठी सदर खतांचा वापर केला. त्या खतांपासून पिकांना काहीच फायदा झाला नसल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी शिल्लक खतांचे नमुने पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालय नागपूर, शेतकी माती परीक्षण केंद्र शंकरपूर येथे तपासणीकरिता पाठवले. दोन्ही ठिकाणाहून आलेल्या तपासणी अहवालामध्ये सदर खतांमध्ये रासायनिक द्रव्यांचे तसेच इतर घटकांचे प्रमाण निर्धारित मानकापेक्षा अत्यल्प आढळून आले आहे. ११ तक्रारकर्ते व परिसरातील शेकडो शेतकऱ्यांची ५० लाखांपेक्षा जास्त रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती पीडित शेतकऱ्यांनी लोकमतला दिली.
मिरची उधारीचे पैसे देण्याऐवजी शेतकऱ्यांच्या माथी मारले बोगस खत
दत्त कृषी केंद्राचे संचालक राजू वैद्य मोठे मिरची व्यापारी आहेत. त्यांचा माल दिल्लीपर्यंत जातो. दरवर्षी परिसरातील शेतकरी व दलालांकडून ते लाखो रुपयांची मिरची उधारीवर खरेदी करतात; मात्र यंदा शेतकऱ्यांना मिरचीचे उधार असलेले शेतकऱ्यांचे पैसे वैद्य यांनी दिले नाही. हंगामाच्या वेळी शेतकरी अडचणीत आले. म्हणून नाइलाजाने खत व अन्य औषध शेतकऱ्यांना दत्त कृषी केंद्रातून विकत घ्यावी लागली.
ज्या शेतकऱ्यांनी तक्रार केली आहे, त्यांच्याकडे माझी जुनी उधारी बाकी आहे. मी उधारी मागितल्यामुळे मला बदनाम करण्यासाठी शेतकऱ्यांनी खोटी तक्रार दाखल केली आहे. कृषी विभागाने माझ्या दुकानातून खतांचे नमुने तपासणीसाठी नेले असून, त्याचा अहवाल यायचा आहे.
- राजू वैद्य, संचालक, दत्त कृषी केंद्र, शंकरपूर.