शाळा बनल्या कमाईचे साधन : अधिकाऱ्यांकडून मात्र पाठराखणचंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक तालुक्यात बोगस शाळांचा सुळसुळाट झाला असून यात इंग्रजी शाळांचे प्रमाण जास्त आहे. संस्थाचालकांना पैसा कमाविण्याचा मोह आवरत नसल्यामुळे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसोबत मिलिभगत करुन हा गोरखधंदा सुरू आहे. यामध्ये मात्र विद्यार्थी व पालक शैक्षणिकृदृष्ट्या भरडल्या जात आहेत.बोगस शाळांमध्ये प्रवेश घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना परिक्षेपासून वंचित राहावे लागल्याच्या जिल्ह्यात अनेक घटना घडल्या. तरीसुद्धा शिक्षण विभागाची झोप उघडली नसल्याचे वास्तव आहे. आजघडीला जिल्ह्यात अनेक ठिकाणी बोगस शाळा सुरू असताना शिक्षण विभाग डोळे बंद करुन आहे. तालुकास्तरावरील शिक्षण विभागाचे अधिकारी चिरीमिरी घेऊन अशा शाळांना अभय देत असल्याची माहिती समोर आली आहे. विद्यार्थ्यांचे पालक मात्र यापासून अनभिज्ञ आहे.शिक्षण विभागाने काही महिन्यांपूर्वी अवैध शाळांवर कारवाई करण्यासंदर्भात संस्था चालकांना पत्र पाठविले होते. मात्र त्यानंतर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. जे शिक्षण देशाचा आधारस्तंभ घडविते, ते शिक्षण देणाऱ्या संस्थाच अवैधरित्या शिक्षण देत असेल तर समाज घडवण्याची अपेक्षा नागरिकांनी कोणाकडून करायची, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयात तर जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध शाळांची अद्ययावत यादी सुद्धा मिळणे कठीण आहे. कारण तालुका स्तरावरच अशा शाळांना चिरिमीरी घेऊन अभय देण्यात येत आहे.अवैध शाळा चालविणाऱ्या संस्था चालकांकडून संबंधित विभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी १० ते १५ हजारांपर्यंत रक्कम घेऊन अशा शाळांची पाठराखण करताना दिसतात. संस्थाचालकांना शाळा बंद करण्याच्या सल्ला न देता तुम्ही चालवा आम्ही पाहून घेऊ, असे सांगून दिलासा संस्था चालकांना दिलासा देतात. यावर अंकुश आणून अशा शाळांवर कारवाई करण्याची गरज आहे. दहा संस्थाचालकांना जगविण्यासाठी शिक्षण विभाग शेकडो विद्यार्थ्यांच्या आयुष्यासोबत खेळत असल्याचे दिसत आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात बोगस शाळांचा सुळसुळाट
By admin | Published: June 26, 2014 11:09 PM