शेतकऱ्यांची फसगत - बोगस बियाणांचे थेट तेलंगणा ,आंध्रप्रदेश , गुजरात कनेक्शन
खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता
गोंडपिपरी : राज्यात कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिनाभरापासून टाळेबंदी करण्यात आली. टाळेबंदीच्या काळात सर्वसामान्य जनतेसह व्यावसायिकांचाही रोजगार बुडाला असताना तालुक्यात हा व्यावसायिकांनी जोर धरला असून आगामी खरीप हंगामाच्या पूर्वीच बोगस बीटी बियाणे विक्रीचा गोरखधंदा जोमात सुरू केल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.
यामुळे पुढील खरीप हंगामात शेतकऱ्याची फसगत होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. तालुक्यात कोरडवाहू क्षेत्र अधिक प्रमाणात असल्याने येथील शेतकरी कापूस सोयाबीन मका काही प्रमाणात भात पिकाची लागवड करतात. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून सोयाबीन उत्पादनात घट व खर्च अधिक असे तफावत समीकरण असल्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस पिकांची लागवड करण्यास सुरुवात केली. शासनाचे अधिकृत कापूस बियाणांचे वाण हे महागडे असून निंदण खर्चाचा अतिरिक्त बोजा बसत असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हे परवडण्यासारखे नाही. असा भ्रम तयार करत बाहेरील विविध राज्यातून काही बोगस बियाणे तस्करांनी अधिक मिळकत कमावण्याच्या हौसेपोटी शेतकऱ्यांना बोगस बियाण्याची भुरळ घातली. स्वस्त व लागवडीस उत्तम तसेच निंदण खर्च कमी होत असल्याचे शेतकऱ्यांना सांगत या बोगस बियाणे विक्रेत्यांनी तालुक्यातील तसेच आसपासच्या परिसरातील गावांमध्ये आपले एजंट नेमलेले असून त्यांना हंगामापूर्वी माल पुरविण्याचा प्रकार जोमात सुरू केला आहे.
सद्यस्थितीत तालुक्यातील बोरगाव, वडोली, भं. तळोधी मक्ता, गणेश पिंपरी, धाबा, लाठी, विठ्ठल वाडा, तारसा आदी गावांमधील काही युवकांनी चोर बिटी विक्रीचा व्यवसाय तेजीने सुरू केला असून नजिक असलेल्या मूल तालुक्यातील नांदगाव व पोंभूर्णा तालुक्यातील भीमनी येथीलही विक्रेत्यांनी संपूर्ण तालुका व परिसराला टार्गेट केल्याची माहिती हाती आली आहे. सदर अवैध व्यावसायिक दरवर्षी तालुका व इतर परिसरातून या अवैध व्यवसायामार्फत कोट्यवधींची उलाढाल करीत असून थेट तेलंगणा, गुजरात व आंध्र प्रदेशमधील बोगस बियाणांची आयात करून शेतकऱ्यांची फसगत करीत आहेत. सोबतच तेलंगणा राज्यात बंदी असलेल्या ग्लायसील या रासायनिक औषधाची तस्करीसुद्धा गोंडपिपरी तालुक्यातून होत असून प्रचंड नफा कमवण्याचा काहींनी चंग बांधला आहे.
बॉक्स
तेलंगणा, आंध्र व गुजरातमधून येते बियाणे
गतवर्षी तालुक्यात तेलंगणा, आंध्र प्रदेश, व गुजरात राज्यातून प्रचंड प्रमाणात चोर बीटी हे बोगस बियाणे विक्रीस आणण्यात आले होते. त्यावर कृषी व पोलीस विभागाने संयुक्तरीत्या कारवाईचा बडगा उगारला. मात्र मूळ पुरवठाधारकांपर्यंत पोहचण्यात अद्यापही दोन्ही विभाग असमर्थ ठरले असून यंदाही तेलंगणा, आंध्र प्रदेश, गुजरात राज्यातून थेट गोंडपिपरी तालुका, शेजारील अहेरी तालुका ,चामोर्शी व परिसरातील संपूर्ण कोरडवाहू क्षेत्र असलेल्या भागात चोर बीटी विक्रीचे जाळे मजबूत विणले गेल्याची माहिती आहे.