कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढल्याने जिल्ह्यासाठी दरदिवशी २० मेट्रिक टनप्रमाणे दोन दिवसाआड ४० मेट्रिक टन ऑक्सिजन मंजूर होता. मात्र, सुरुवातीला पुरेशा क्षमतेचे वायू टँकर न मिळाल्याने केवळ २५ मेट्रिक टन ऑक्सिजनची उचल करणे सुरू होते. दरम्यान, कोरोना उद्रेकामुळे गंभीर रुग्णांची संख्या वाढल्याने अतिरिक्त ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले. ऑक्सिजन तूट भरून निघत असतानाच मार्च २०२१ च्या पहिल्या आठवड्यापासून शासकीय व खासगी कोविड रुग्णालये फुल्ल झाली. वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्याने काही रुग्णांचे बळी गेले, याच काळात नैसर्गिक ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे कामही सुरू झाले. आता रुग्णसंख्या कमी असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन काही प्लांटची कामे अजूनही सुरू आहेत.
मार्चमध्ये असा होता ऑक्सिजन पुरवठा
कोरोना रुग्णवाढ झपाट्याने सुरू असताना दर दोन दिवसाआड २५ मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन भिलाईतून चंद्रपुरात आणला जात होता. त्यातील १० मेट्रिक टन आदित्य एअर प्रॉडक्टला आणि १५ मेट्रिक टन रुक्मिणी मेटॅलिकला मिळायचा. वाहतुकीसाठी तब्बल ३६ तास खर्ची व्हायचे. आज ही धावपळ थांबली आहे.
गडचिरोलीचाही पुरवठा घटला
चंद्रपूर एमआयडीसीमधील प्लांटमधून गडचिरोलीत ५०० आणि यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे ६० सिलिंडर पाठविले जात होते. एक वाहन भरण्यापूर्वीच दुसरे वाहन वेटिंगवर असायचे. आताची स्थिती पूर्णत: बदलली आहे. ऑक्सिजन पुरवठा कमालीचा खाली आला आहे.
सद्यस्थितीत दोन टँकरच पुरेसे
चंद्रपूर जिल्ह्यासाठी दोन टँकरद्वारे लिक्विड ऑक्सिजन वाहतूक करता येऊ शकते. एकाची १० मेट्रिक टन तर दुसऱ्या टँकरची क्षमता १५ मेट्रिक टन आहे. एवढा ऑक्सिजन सध्यातरी पुरेसा असल्याची माहिती सूत्राने दिली. जिल्ह्याचा प्रतिदिवस मंजूर २० मेट्रिक टन याप्रमाणे दोन दिवसांत ४० मेट्रिक टन
ऑक्सिजन पुरवठा होऊ शकतो. परंतु, आता मेडिकल ऑक्सिजनची मागणी कमी झाली. हा ऑक्सिजन उद्योगांकडे वळविण्यात आला. मागणी नसल्याने दोन टँकर पुरेसे असल्याची माहिती आहे.
आठवड्यातून चार दिवस प्लांट बंद
जिल्ह्याची ऑक्सिजन रिफिलिंग क्षमता २३०० मेट्रिक टन आहे. चंद्रपुरात रिफिलिंगचे काम आदित्य एअर व रुक्मिणी मेटॅलिक या दोन कंपन्या करतात. एका सिलिंडरमध्ये ७ हजार लिटर लिक्विड ऑक्सिजन असते. कोरोना उद्रेकाच्या काळात आदित्यमध्ये दररोज ६० तर रुक्मिणीत ४० सिलिंडरमध्ये प्रेशरद्वारे ऑक्सिजन भरले जाते. आता मागणीअभावी रिफिलिंगचे काम आठवड्यातून तीन-चार दिवस बंद ठेवले जात आहे.
कोट
चंद्रपूर जिल्ह्यात आता १२ ते १५ मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा होत आहे. कोविड उद्रेकाच्या काळात स्थिती वेगळी होती. रुग्णसंख्या कमी झाली. मात्र, संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने ऑक्सिजन वितरणावर पूर्ण नियंत्रण ठेवले. निर्बंध शिथिल झाल्याने आता उद्योगांसाठीही ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे.
-नितीन मोहिते, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, चंद्रपूर
कोट
मेडिकल ऑक्सिजनची मागणी घटली हे खरे आहे. उद्योगांच्या मागणीनुसार पुरवठा सुरू आहे. मात्र, अजृनही उद्योगचक्राला गती मिळाली नाही. त्यामुळे मागणीत उठाव नाही. उद्योगांची स्थिती बदलायला पुन्हा काही दिवस लागतील. त्यामुळे वाट पाहणे सुरू आहे.
-इशान गोयल, संचालक, आदित्य एअर प्रॉडक्ट, चंद्रपूर