चंद्रपूर : महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता सार्वजनिक रस्त्यावर बोअरवेल खोदणे दारू दुकानदार तसेच बोअरवेल कंत्राटदाराला भारी पडले. यासंदर्भातील माहिती महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाला मिळाल्यानंतर पथकाने चौकशी करून रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी दारू दुकान अनुज्ञप्तीधारक एल.डी. खोब्रागडे तसेच बोअरवेल ट्रक मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाला शनिवारी उत्तम नगर येथे अवैधरित्या बोअरवेलचे काम सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने पाहणी केली. त्यानंतर एल.डी. खोब्रागडे यांच्या मालकीच्या देशी दारू दुकानाजवळ महापालिकेची कोणतीही पूर्व परवानगी न घेता सार्वजनिक रस्त्यावर बोअरवेल खोदण्याचे काम सुरू होते. सार्वजनिक मालमत्तेस नुकसान करीत असल्याचा ठपका ठेवून महापालिकेच्या पथकाने काम बंद केले. तसेच दारू दुकान अनुज्ञप्तीधारक एल.डी. खोब्रागडे, बोअरवेल वाहन क्रमांक ए.पी. २८ बीयू ४९८८ या क्रमांकाच्या वाहन मालकाविरुद्ध रामनगर पोलिस स्टेशन येथे तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
रेन वाॅटर हार्वेस्टिंग बंधनकारक
पाण्यासाठी बोअरवेल खोदण्याचे प्रमाण शहरात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सातत्याने पाण्याची कमी होणारी पातळी पाहता महापालिकेतर्फे बोअरवेल खणन होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहे. दरम्यान, ज्यांच्याकडे विहीर, बोअरवेल आहे, त्यांनारेन वॉटर हार्वेस्टिंग करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
अन्यथा होणार २० हजारांचा दंड
दिवसेंदिवस शहरातील पाण्याची पातळी हमी होत आहे. त्यामुळे भविष्याचा विचार करता पाणी वाचविणे, मुरविणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी महापालिकेने शहरात रेन वाॅटर हार्वेस्टिग करण्यासंदर्भात जनजागृती करणे सुरू केले आहे. एवढेच नाही तर घर टॅक्समध्ये काही टक्के सुट तसेच यासाठी अनुदानही दिले जात आहे. असे असतानाही जे कुणी ठराविक कालावधीमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग करणार नाही, त्यांच्यावर २० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार असल्याचेही महापालिकेने म्हटले आहे.