मुंबई: वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत काल वन विभाग आणि राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्था (नॅशनल बॉटनिकल रिसर्च इन्स्टिट्युट, लखनऊ) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला असून यातून चंद्रपूर जिल्ह्यात साकारल्या जाणाऱ्या बॉटनिकल गार्डनच्या माध्यमातून विदर्भातील वृक्ष प्रजातींचे सरंक्षण आणि संवर्धन होण्यास मदत होणार असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. काल सह्याद्री अतिथीगृहात हा सामंजस्य करार संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वन विभागाचे सचिव विकास खारगे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी, राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्थेचे अधिकारी उपस्थित होते.
नॅशनल बॉटनिकल रिसर्च इन्स्टिट्युट ही केंद्र सरकारच्या सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट अंतर्गत काम करणारी संस्था असल्याचे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले की, चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारशहा मार्गावर विसापूर येथे साकारल्या जाणाऱ्या जैवविविधता उद्यानासाठी राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्थेची तांत्रिक मदत होणार आहे.
विदर्भ जैवविविधतेने संपन्न असा प्रदेश आहे. वनस्पती आणि प्राण्यांचे मूळ वंशज जंगलातच आढळून येतात. त्याचे रक्षण होणे अत्यंत आवश्यक आहे. दुर्मिळ आणि धोकाग्रस्त प्राणी आणि वनस्पतींचे संरक्षण आणि संवर्धन करणे, जनसामान्यांना जैवविविधतेचे महत्व पटवून सांगणे, जनजागृती करणे, दुर्मिळ जैवविविधतेचे संवर्धन करणे, स्थानिकांना रोजगार निर्मिती करून देणे या उद्देशाने चंद्रपूर जिल्ह्यात हे जैवविविधता उद्यान उभारले जात आहे.
यासाठी वन तसेच महसूल विभागाने जागा उपलब्ध करून दिली असून या उद्यानात कुतूहल निर्माण करणाऱ्या सायन्स पार्क, सायन्स राईड यासह विविध कामे प्रस्तावित आहेत. वृक्ष प्रजातींच्या अभ्यासकांसाठी हे एक एकात्मिक अध्ययन केंद्र ठरावे, यामाध्यमातून विदर्भातील वृक्ष तसेच वन्यजीव प्रजातींची सर्वंकष माहिती राज्यातील जनतेला आणि या क्षेत्रातील संशोधकांना मिळावी हा प्रयत्न असल्याचे सांगतांना वनमंत्र्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील जैवविविधता उद्यानाच्या कामाला गती देण्याच्या सूचनाही वन विभागास दिल्या.