आरक्षण जाहीर : ऐन पावसाळ्यात वातावरण तापायला लागले !राजू गेडाम - मूलमहाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. मा.सा. कन्नमवार व सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कर्मभूमी म्हणून मूल शहराला ओळखल्या जाते. त्यामुळेच या शहराला राजकीय वारसा लाभला आहे. त्यामुळे सर्वच राजकिय पक्ष शहरात आहेत. नुकतीच नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक येत्या २ डिसेंबरला होणार असल्याने तसेच नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडायचा असल्याने सर्वच नेत्यांमध्ये चढाओढ लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ऐन पावसाच्या दिवसात निवडणुकीचे वातावरण तापले आहे.राज्याचे अर्थमंत्री तथा क्षेत्राचे प्रतिनिधी सुधीर मुनगंटीवार यांनी स्वत: निधी खेचून आणून विकास कामांना गती दिली. सिमेंंट काँक्रीट रस्त्यामुळे शहराचा चेहरा बदलवला आहे. चौपदरी रस्ते झाल्याने वाहनाना होणारा अडथळा तसेच अपघातावर नियंत्रण करता आले. तसेच बायपास मंजूर झाल्याने वाहनांची वर्दळ शहराच्या बाहेर गेली आहे. तलावाचे सौंदर्यीकरण, बगीचे, स्विमिंग पूल, तसेच आवश्यक सुविधा प्रस्तावित आहे. काही महिन्यात त्या कार्यान्वित होतील. गांधी चौकात सिंग्नल तसेच शहरात किलोमीटरचे अंतर दर्शविणारा चंद्रपूर शहरात लावल्या गेला त्याप्रमाणे बोर्ड लावल्यास मूल शहराला लूक येईल. ना. मुनगंटीवार यांनी आपल्या परीने मूल शहराचा विकास करण्याचा प्रयत्न चालविला. मात्र सत्तारूढ पक्षातील पदाधिकारी, नगरसेवक यांनी एखादे नविन संकल्पनेतून नवीन मूल शहरासाठी ‘मॉडेल’ शोधून त्याचा प्रस्ताव व पाठपुरावा ना. मुनगंटीवाराकडे केव्हाच केला नाही. हेच इतर तालुक्यात असते तर त्यांनी आपल्या कल्पनेतून शहराला जनतेला आवश्यक असल्याचा ‘मॉडेल’ करून आपली प्रतिमा उजाळली असती. मात्र गेल्या ५ वर्षात असे घडलेच नाही. ‘आम्हाला काम नाही’, ही रडगाणी गात पाच वर्षाचा काळ घालविला. त्यामुळे आम्ही नवीन काय केले, हे सांगायला सत्तारूढ पदाधिकारी व नगरसेवकांकडे काही नाही. त्यामुळे निवडणुकीमध्ये विशेष सांगायला पदाधिकारी व नगरसेवक रिकामे आहेत. याचा फायदा विरोध पक्ष काँग्रेसचे नगरसेवक किती घेतात, हे येणाऱ्या काळातच दिसणार आहे.२ डिसेंबरला होत असलेल्या मूल नगरपरिषदेचा निवडणुकीची चढाओढ भाजपा, काँग्रेस या दोन पक्षात जास्त प्रमाणात दिसून येत आहे. नगराध्यक्ष सर्व साधारण प्रवर्गासाठी निश्चित झाल्यास भाजपाच्या वतीने माजी उपाध्यक्ष अनिल संतोषवार, पाणी पुरवठा सभापती प्रशांत समर्थ, नगरसेवक प्रभाकर भोयर, प्रवीण मोहुर्ले, प्रवीण लडवे, चंद्रकांत आष्टनकर, मोती टहलियानी, तर काँग्रेसतर्फे माजी उपाध्यक्ष प्रकाश कागदेलवार, बाबा अझीम, राकेश रत्नावार, माजी अध्यक्ष विजय चिमड्यालवार आदी नावांची चर्चा आहे. नगराध्यक्ष पदासाठी थेट निवडणूक असल्याने नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला स्वत:ला आठ प्रभागात विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. यासाठी विशेष ‘दम’ असणारा उमेदवार भाजपा व काँग्रेस शोधत आहेत. सत्ताधारी सदस्यांमध्ये एकवाक्यता नाहीमूल नगर परिषदेवर भाजपाची सत्ता असून स्पष्ट बहुमत आहे. स्पष्ट बहुमत असतानादेखील बहुतेक विषयावर सत्ताधारी सदस्यांमध्ये एकवाक्यता होत नसल्याने विकास कामांना काही प्रमाणात खीळ बसल्याचे दिसून येते. याचाच फायदा बोटावर मोजण्या इतके विरोधी नगरसेवक घेत असून त्यामुळे सत्ताधारी नगर परिषदेच्या माध्यमातून विकासाची ‘चाबी’ फिरविण्यास अपयशी ठरल्याचे दिसून येते.
नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी नेत्यांमध्ये चढाओढ
By admin | Published: July 03, 2016 1:09 AM