पित्याचा आरोप : १५ दिवसांपासून होता बेपत्ता वरोरा : शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या डोंगरगाव (खडी) परिसरात काल बुधवारी अज्ञात मृतदेह डोंगरगाव येथील नागरिकांना कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. मृताच्या खिशात असलेल्या दुचाकीच्या चाबीने मृताची ओळख पटली आहे. सदर मृतदेह चंद्रपूर येथील नांदगाव पोडे मायनस क्वार्टर येथील रहिवासी प्रधुम सूरज बरडे े(१७) याचे असल्याचे आज गुरुवारी उघडकीस आले. दरम्यान, आपल्या मुलाचा मित्रानेच घात केला, असा आरोप मृताच्या पित्याने केला आहे. भद्रावती तालुक्यातील डोंगरगाव खडी येथील टेकडीवर एका १७ वर्षीय युवकाचे कुजलेल्या अवस्थेत प्रेत डोंगरगाव येथील काही नागरिकांना दिसून आले. मृतदेहाच्या काही अंतरावर रुमाल व काही कपडे विखुरलेले दिसल्याने हा घातपात असल्याचा संशय नागरिकांना होताच नागरिकांनी तत्काळ वरोरा पोलिसांना माहिती दिली. मात्र सदर प्रेत अज्ञात युवकाचे असल्याचे पोलिसांच्या निदर्शनात आले. मृताच्या खिशात असलेल्या दुचाकी व घराची चाबी दिसून आली. सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता वरोरा पोलिसांनी वायरलेसच्या माध्यमातून अज्ञात मृतदेह असल्याची माहिती प्रसारित केली. यावरून मृतदेह चंद्रपूर येथील नांदगाव पोडे मायनस क्वार्टर येथील प्रधूम सुरज बरडे याचा असल्याचे उघडकीस आले. मृत प्रधूम सुरज बरडे याने नुकतीच दहावीची परीक्षा दिली असून संगणक प्रशिक्षणाचे वर्ग त्याने लावले होते. त्याकरिता प्रशिक्षण शुल्क भरण्यासाठी वडिलांकडे त्याने ३३०० रुपये मागितले होते. त्यातील १८०० रुपये त्याने भरले. १३ एप्रिलला सकाळी ११ वाजताच्या सुमारास त्याला बोलविण्यासाठी त्याच्या घरी तीन मित्र आले होते. त्यानंतर स्वत:च्या गाडीने संगणक प्रशिक्षणाकरिता जात असल्याचे घरी सांगत प्रधूम मित्रांसोबत निघून गेला व रात्री परतलाच नाही. त्यामुळे आई-वडिलांनी सर्वत्र शोधासोध सुरु केली . शोध सुरू असताना पहाटे ३ वाजताच्या सुमारास प्रधूमने नेलेली दुचाकी चंद्रपूर येथील अंचलेश्वर गेटजवळ ठेवल्याचे दिसून आले. याची माहिती मृताचे वडिलांनी तात्काळ शहर पोलिसांना दिली व गाडी आहे तर मुलगा याच परिसरातील कुण्यातरी मित्राकडे असवा, असा अंदाज व्यक्त करीत काही वेळ वाट पाहण्याचे ठरविले. पण सकाळ होवूनही गाडीजवळ कोणीच आला नसल्याने वडिलांनी मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार १४ एप्रिल रोजी चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनला नोंदविली. सोशल मिडीयावर फोटो टाकून हरविल्याची माहितीही वायरल केली. त्यावरून मृताचा शोध लागला. २७ एप्रिलला मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला. यावेळी वडिलांनी वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींना खरा प्रकार सांगितला. डोंगरगाव खडी हे गाव आम्हालासुद्धा माहित नसताना माझा मुलगा या ठिकाणी कसा पोहचला? माझ्या मुलाचा मृत्यू संशयास्पद असून त्याचा त्या तीन मित्रांनीच घातपात केल्याचा आरोप मृताच्या पित्याने केला आहे.
मित्रांनीच केला मुलाचा घात
By admin | Published: April 28, 2017 12:54 AM