चंद्रपूर : मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी पर्यवेक्षक व प्रगणक म्हणून शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र या सर्वेक्षणाला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेने बहिष्कार टाकला आहे.विद्यार्थ्यांच्या सराव परीक्षा, प्रजासत्ताक दिनाची तयारी, अध्यापनाचे महत्त्वाचे कार्य असतानाच हे नवीनच काम सोपविण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. यासंदर्भातील आमदार सुधाकर अडबाले यांच्या मार्गदर्शनामध्ये मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, आयुक्तांना जिल्हा पदाधिकारी, शेकडो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.
निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळामध्ये विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हा कार्यवाह श्रीहरी शेंडे, कोषाध्यक्ष दिगांबर कुरेकर, शहर कार्यवाह सुरेंद्र अडबाले, विज्युक्टाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. प्रवीण चटप, सचिव प्रा. प्रमोद उरकुडे यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
शाळा चालवायची कशी?
राज्यातील जवळपास सर्व शाळा, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक वगळून इतर सर्व शिक्षकांना सर्वेक्षणाच्या कामाला नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व शिक्षक सर्वेक्षण करणार तर शाळा चालवायची कशी, असा प्रश्न आमदार अडबाले यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात केला आहे.
सध्या दहावी, बारावीच्या परीक्षेचे दिवस जवळ आले आहेत. त्यामुळे शिक्षकांना अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे, हा शिक्षकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. शिक्षकांना प्रथम हे शैक्षणिक काम करणे गरजेचे आहे. मात्र मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्याकरिता शिक्षकांची केलेली नियुक्ती योग्य नाही.
-सुधाकर अडबाले,आमदार