राष्ट्रीय महामार्ग नावापुरते : ‘अच्छे दिन’ची प्रतीक्षाब्रह्मपुरी : केंद्रीय रस्ते निर्माण मंत्रालय विभागाने राज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर केलेला ब्रह्मपुरी-नागभीड मार्ग जागोजागी खड्डे, अरूंद रस्ता व जीवघेणी रहदारीमुळे मरणयातना भोगत आहे.पूर्वी हा रस्ता राज्य मार्ग असताना बांधकाम विभागाचे लक्ष असायचे. त्यामुळे लगेच त्यावर निदान डाकडूगी केली जात होती. आता या रस्त्याचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर झाल्याने याचा वाली कोणीच नसल्याचे सध्या तरी दिसून येत आहे. नुकतेच केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी नागभीडला येऊन गेले. त्यांनी रस्त्यांचा विकास म्हणजे ग्रामीण व शहरी भागाचा विकास असल्याचे भाषणात सांगितले. परंतु त्यांच्या या वक्त्यानुसार या राष्ट्रीय महामार्गाला ‘अच्छे दिन’ केव्हा येणार, याचा मात्र थांगपत्ता नाही. या रस्त्यावरून लहान - मोठी वाहने अहोरात्र धावत असतात. रस्त्याला जागोजागी पडलेल्या खड्डयांमुळे वाहन चालविताना कसरत करावी लागते. प्रसंगी खड्डा चुकविण्याच्या नादात अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तरीही बांधकाम विभागाचे लक्ष का जात नाही, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रीय महामार्गाचे काम जेव्हा सुरू होईल तेव्हाच हा रस्ता बनेल, असे धोरण असेल तर किमान त्यांच्या योग्य दुरूस्तीकडे लक्ष देऊन त्याला व वाहनांच्या हालअपेष्टांना तूर्त वाट करून देण्याचेही सौजन्य संबंधित विभागाकडून केले जात नसल्याने वाहनधारकांचा रोष निर्माण झाला आहे. ब्रह्मपुरी शहराच्या देलनवाडीपासून ख्रिस्तानंद चौकापर्यंत अनेक शाळेकरी विद्यार्थी सायकलने, महिला वर्ग मोटरसायकल व पायी जात असताना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. रस्त्याची रहदारी लक्षात घेऊन प्राथमिकता देण्याचे सौजन्यही संबंधित विभागाला होत नसेल तर केवळ वेतनासाठीच कर्मचाऱ्यांचे काम असले पाहिजे, असाही खोचक सवाल नागरिकांकडून केला जात आहे. यापेक्षा हा रस्ता पूर्वी राज्यमार्ग होता तेच बरे होते, असेही बोलले जात आहे. खासदार नेते यांनी या समस्येची दखल घेऊन किमान या रस्त्याला मरणयातनेतून सोडविण्याची मागणी केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)
ब्रह्मपुरी-नागभीड महामार्ग भोगतो आहे मरणयातना
By admin | Published: January 24, 2017 12:46 AM