ब्रम्हपुरी : ब्रम्हपुरी शहर हे विदर्भातील शिक्षण, आरोग्य, रेल्वे, उद्योग, बाजारपेठ यांचे माहेरघर असून, बाजूला प्रशासकीय इमारतीसाठी मोठमोठे विशालकाय पटांगण आहेत. लँड रेव्हेन्यू काेड कलम ४ नुसार प्रशासकीय साेय व जनतेची साेय यासाठी ब्रम्हपुरीच जिल्हा मुख्यालय अधिक सोईचे असल्याने नवीन ब्रम्हपुरी जिल्हा निर्माण करावा, अशी मागणी कृतिसंसाधन समितीने केली आहे.
यासाठी कृतिसंसाधन समिती ब्रम्हपुरीद्वारा यशवंत खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना नुकतेच निवेदन पाठविण्यात आले. यावेळी येणाऱ्या विधानसभा, लोकसभा निवडणूक मतपत्रिकेने घ्याव्यात, पेट्रोल, डिझेलचे दर कमी करावे, आवळगावला मोठे रुग्णालय निर्माण करावे, अशा मागण्याही करण्यात आल्या. तहसीलदार याेगेश शिंदे यांना निवेदन देताना यशवंत खोब्रागडे, नामदेव कावळे, भाऊराव मेश्राम, इश्वर जनबंधू, माेतीलाल देशमुख उपस्थित होते.