ब्रह्मपुरी: १ एप्रिल २०२० पासून ते जानेवारी २०२१ पर्यंत ब्रह्मपुरी तालुक्यातील व शहरातील एकूण पाच हजार ३५२ विद्युत ग्राहकांनी वीज बिलाचा भरणा केला नाही. त्यामुळे १० महिन्यात एकूण तीन कोटी २४ लाख २८ हजार रुपयांचे वीज बिल थकीत झाले आहे.
गेल्या कित्येक महिन्यांपासून वीज बिल थकीत असल्याने महावितरण कंपनीला मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. गेल्या मार्च महिन्यांपासून अनेक ग्राहकांकडे वीज बिल थकीत आहेत. महावितरण कंपनीने आपल्या ग्राहकांना वेळोवेळी वीज बिल भरण्यासंदर्भात सूचना दिल्या. परंतु बऱ्याच ग्राहकांनी गेल्या एक वर्षांपासून आपले वीज बिल भरले नाही. त्यामुळे आता महावितरण कंपनीने वीज बिल भरण्यासाठी सक्तीची मोहीम हाती घेतली आहे ज्यांच्याकडे वीज बिल थकीत आहे त्यांनी कमीत कमी ५0 टक्के वीज बिल भरल्यास काही काळ वीजपुरवठा खंडित करण्यात येणार नाही,
परंतु जे ग्राहक कसल्याही प्रकारे विजेचा भरणा करणार नाही, त्यांचा वीजपुरवठा तत्काळ खंडित करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे वीज बिल मोठ्या प्रमाणात थकीत आहे, त्यांनी तत्काळ वीज बिलाचा भरणा करावा अन्यथा महावितरण कंपनीचे कर्मचारी वीजपुरवठा खंडित करणार आहेत, असे महावितरणने स्पष्ट केले आहे. यावेळी कोणत्याही प्रकारची दयामाया दाखविली जाणार नाही. कमीत कमी ५० टक्के वीज बिलाचा भरणा करावाच लागेल. वीज बिल वसुलीसाठी तसेच विद्युत पुरवठा खंडित करण्यासाठी आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ तसेच मारहाण करण्यात आल्यास पोलीस कारवाई करण्यात येणार आहे. महावितरण कंपनीने सक्तीची वीज बिल वसुली सुरू केली असून ज्यांनी थकीत वीज बिल भरले नाही अशा जवळपास ७० ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे.