रवी रणदिवे
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ब्रह्मपुरी तालुका हा तांदळाचे आगार म्हणून ओळखला जातो. येथील तांदळाला आता विदेशातूनही मागणी होऊ लागली आहे. रोज सुमारे ५०० टन तांदूळ थेट विदेशात जात आहे. सातासमुद्रापार जात असलेल्या या तांदळाचे नाव ‘उकडा’ असे आहे. ११० जातीच्या धानापासून हा तांदूळ होतो. यामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या एका टोकावर असलेल्या ब्रह्मपुरी तालुक्याची ओळख सातासमुद्रापार झाली आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यात जवळपास १५ राईस मिल आहेत. तेथे साध्या तांदळापासून उकडा तांदळाचे उत्पादन घेतले जाते. रोज ५०० टन उकडा तांदूळ साऊथ आफ्रिका, दुबई, सिंगापूर, केनिया या देशांना पाठवला जातो. येथील राईस मिलमध्ये तांदळाची निर्मिती झाल्यानंतर हा तांदूळ विशिष्ट वजनाच्या पिशव्यांमध्ये पॅक केला जातो. नंतर ट्रकने नागपूरला तेथून रेल्वेने मुंबईला व नंतर जहाजाने त्याची विदेशात निर्यात होते.
ब्रह्मपुरी तालुक्यात २९ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाते आहे. शेतकरी काही धान वर्षभराच्या उपजीविकेसाठी शिल्लक ठेवून उर्वरित धानाची विक्री करतो. धानविक्रीचा हा हंगाम नोव्हेंबरपासून जुलै महिन्यापर्यंत चालतो. उच्च प्रतीच्या धानाला दोन हजार सहाशेपर्यंत भाव मिळत आहे.
दक्षिण आफ्रिका, दुबई, सिंगापूर व केनिया या देशांतून तांदळाची मागणी आहे. रोज ५०० टन तांदूळ निर्यात केला जात आहे. समुद्रसपाटीच्या भागात असलेल्या विदेशांतील नागरिकांकडून ही मागणी अधिक आहे.
- डॉ. नितीन उराडे, उद्योजक, साई राईस मिल, ब्रह्मपुरी.