ब्रह्मपुरी: अवैध सुगंधित तंबाखू विक्रेत्यांविरुद्ध ब्रह्मपुरी पोलिसांनी विशेष मोहीम राबवून गुरुवारी, दि. ७ फेब्रुवारी रोजी दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून सुगंधित तंबाखू जप्त केली आहे. दिलीप दामोदर राऊत (वय ५०), वासुदेव केवळराम बेद्रे (४७, दोघेही रा. अऱ्हेरनवरगाव, ता. ब्रह्मपुरी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
सुगंधित तंबाखू व्रिकीवर बंदी असतानाही अनेकजण अवैधरीत्या सुगंधित तंबाखूची तस्करी करतात. अशा अवैध विक्रेत्यांवर ब्रह्मपुरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अनिल जिट्टावार यांच्या नेतृत्वात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. दरम्यान, सुगंधित तंबाखू घरी लपवून ठेवल्याची गुप्त माहिती ठाणेदार जिट्टावार यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारावर त्यांच्या पथकाने अऱ्हेरनवरगाव येथील वासुदेव बेद्रे याच्या घरी धाड टाकून तीन हजार ८०० रुपये किमतीचा, तसेच दिलीप राऊत यांच्या घरी धाड टाकून नऊ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या दोघांनाही ब्रह्मपुरी पोलिसांनी अटक केली आहे. ब्रह्मपुरी पोलिसांच्या या कारवाईने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक सुदर्शन मुम्मका, अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखील, ब्रह्मपुरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अनिल जिट्टावार यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक वैभव कोरवते, धनराज नेवारे, पिसे, वाटेकर, नरेश कोरडे, पुरुषोत्तम भरडे यांच्यासह ब्रह्मपुरी पोलिसांनी केली.